21 April 2019

News Flash

आशियाई रणधुमाळीला आजपासून सुरुवात

बांगलादेश-श्रीलंका यांच्यात रंगणार पहिला सामना

आशिया चषकाचा अनावरण सोहळा शुक्रवारी पार पडला. यावेळी सहाही देशांचे कर्णधार उपस्थित होते.

बांगलादेश-श्रीलंका यांच्यात रंगणार पहिला सामना

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने विश्रांती घेतली असली तरी भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत नेहमीच क्रिकेटरसिकांसाठी खास पर्वणी राहिली आहे. याच पाश्र्वभूमीवर शनिवारपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेकडे सर्वाचे डोळे लागले आहेत. सहा देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचा प्रारंभ बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने होणार आहे.

गेल्या काही वर्षांत बागंलादेशने या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २०१६ मध्ये मायभूमीत झालेल्या स्पर्धेत त्यांनी अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. तसेच २०१२मध्येसुद्धा त्यांनी मश्रफी मोर्तझाच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत मजल मारली होती. बागंलादेशची फलंदाजी अनुभवी तमिम इक्बाल आणि शकिब-अल-हसन यांच्यावर प्रामुख्याने अवलंबून आहे.

दुसरीकडे श्रीलंकेला गेल्या दोन वर्षांत भारताकडून तिन्ही प्रकारात सपशेल शरणागती पत्करावी लागली. अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज, उपुल थरंगा, थिसारा परेरा आणि लसिथ मलिंगावर श्रीलंकेची भिस्त आहे. त्याशिवाय युवा खेळाडू अकिला धनंजया, दसून शनाका आणि कसुन रजिथा यांच्याकडे ही सर्वाच्या नजरा आहेत. कामगिरीतील सातत्य राखण्यात श्रीलंकेला मागील काही मालिकांपासून अपयश येत आहे. यावर त्यांना लवकरच योग्य तोडगा काढावा लागेल.

  • सामन्याची वेळ : सायं. ५ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि ३.

First Published on September 15, 2018 2:38 am

Web Title: asia cup 2018