आशिया चषकाच्या सुरुवातीच्या सामन्यातच भारताची सुरुवात म्हणावी तशी चांगली झालेली नाहीय दुबळ्या हाँग काँगविरुद्ध भारताला रडत-खडत विजय मिळाला, भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हाँग काँगच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांच्या चांगलेच नाकीनऊ आणले. मात्र युझवेंद्र चहलने मोक्याच्या क्षणी विकेट घेतल्यामुळे भारताने सामन्यात बाजी मारली.

आज आशिया चषकात भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हाँग काँगविरुद्ध सामन्यात झालेली कामगिरी लक्षात घेता, महत्वाच्या सामन्यासाठी भारत आपल्या संघात २ बदल करण्याची शक्यता आहे.

पहिला बदल – शार्दुल ठाकूर ऐवजी हार्दिक पांड्याला संघात स्थान

हाँग काँगविरुद्ध सामन्याच शार्दुल ठाकूरला पहिल्या स्पेलमध्ये चांगलाच मार पडला. ३ षटकांमध्ये शार्दुलने २८ धावा दिल्या. नंतरच्या सत्रात दिलेल्या एका षटकातही शार्दुलने चांगल्याच धावा दिल्या. त्याची ही कामगिरी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला संघात स्थान मिळवून देऊ शकते.

इंग्लंड दौऱ्यावरुन परतलेल्या हार्दिक पांड्याला हाँग काँगविरुद्धच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. फलंदाजीतही मधल्या फळीतले फलंदाज हाँग काँगविरुद्ध धावा जमवण्यात अपयशी ठरले होते. त्यामुळे पाकविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याचा संघात समावेश संघासाठी चांगलाच फायदेशीर ठरु शकतो.

दुसरा बदल – खलिल अहमदच्या जागेवर जसप्रीत बुमराहला संघात स्थान

हाँग काँगविरुद्ध सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापनाने खलिल अहमदला संघात जागा दिली. अहमदनेही पहिल्या सामन्यात ४८ धावांत ३ बळी घेत आपली दखल घ्यायला भाग पाडलं. मात्र भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा दबाव लक्षात घेता संघ व्यवस्थाप बुमराहला संघात जागा देऊ शकतं.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये बुमराह हा भारताचा सर्वोत्तम गोलंदाज आहे. अखेरच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करणं हे बुमराहचं वैशिष्ट्य..त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बुमराहचं संघात असणं फायदेशीर ठरु शकतं.