कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात संघाचं कर्णधारपद भूषवणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने, पंचांच्या निर्णयावर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. अफगाणिस्तानने दिलेल्या २५३ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ २५२ धावांमध्ये सर्वबाद झाला, यामुळे सामना बरोबरीत सुटला गेला. यावेळी धोनी आणि दिनेश कार्तिक यांना पंचांनी चुकीच्या प्रकारे बाद ठरवल्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच नाराजी व्यक्त केली जात होती.

अवश्य वाचा – Asia Cup 2018 : मी DRS चा निर्णय घ्यायला नको होता – लोकेश राहुल

सामना संपल्यानंतर धोनीने याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. “मधल्या काळात आमचे फलंदाज धावबाद झाले, त्या गोष्टी टाळता आल्या असत्या. काही गोष्टी आमच्या विरोधातही गेल्या, मात्र त्यावर मला भाष्य करायचे नाही, नाहीतर माझ्यावर कारवाई होईल. पण अखेरच्या षटकांमध्ये अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी सुरेथ मारा केला.” धोनीने अफगाणिस्तानच्या खेळाचं कौतुक केलं.

अवश्य वाचा – Asia Cup 2018 : अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात ९ विक्रमांची नोंद, धोनीच्या नावावर ३ विक्रम

कर्णधार म्हणून धोनीचा हा २०० वा सामना होता. फलंदाजीदरम्यान जावेद अहमदीच्या गोलंदाजीवर धोनी पायचीत असल्याचं अपील करण्यात आलं होतं, जे पंचांनीही उचलून धरलं. मात्र टिव्ही रिप्लेमध्ये चेंडू यष्टींच्या बाहेर जात असल्याचं दिसतं होतं. दिनेश कार्तिकलाही अशाच प्रकारे पंचांनी बाद ठरवलं. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात पंचांवर सोशल मीडियामधून चांगलीच टीका करण्यात आली.