Asia Cup 2018 : आजपासून आशिया चषक स्पर्धेची सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत आज बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात सलामीची लढत रंगणार आहे. तर भारताची सलामीची लढत १८ तारखेला हाँगकाँगशी होणार आहे. या स्पर्धेच्या पूर्वसंध्येला सर्व कर्णधारांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद शेजारीच बसले होते. त्यामुळे त्यांच्यातील भाष्य आणि अन्य घडामोडी टिपण्यासाठी प्रसारमाध्यमांचे कॅमेरे सज्ज होते. मात्र, या पत्रकार परिषदेतील सर्व कर्णधारांच्या प्रतिक्रियांचे चित्रण करताना कॅमेरामन्सनी भारताचा कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद आणि बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मोर्ताझा यांच्यात रंगलेल्या ‘त्या’ गप्पाही टिपल्या आणि मैदानाबाहेर कर्णधार काय चर्चा करतात हे सर्वांना समजले.

कर्णधारांच्या ‘ऑफ द रेकॉर्ड’ गप्पांमध्ये बांगलादेशच्या खेळाडूच्या निलंबनाचा विषय निघाला. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. हा विषय निघताच रोहित, सर्फराज आणि मोर्ताझा यांच्यात बऱ्याच रंगतदार गप्पा रंगल्या. सर्फराजने हा विषय काढला. त्याने विचारले की शब्बीरला लग्न करायचे नाही का? तो सतत नियमांचे उल्लंघन का करत आहे? त्यावर मोर्ताझाला त्याच्या खेळाडूंना आवरण्याचा सल्ला रोहितने दिला.

ऐका गप्पा –

या व्यतिरिक्त रोहितने भारत आणि पाकिस्तान सामन्यावरही आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, ”या सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे, परंतु आम्ही एका वेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत. पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची नेहमीच उत्सुकता लागलेली असते.”

आशिया चषक स्पर्धेतून प्रत्येक संघ पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी संघबांधणी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ” विश्वचषक स्पर्धेत सकारात्मक मानसिकतेने उतरण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असणार आहे. पण, आम्ही एवढी दूरचा विचार करत नाही. आशिया चषक स्पर्धेतून विश्वचषक स्पर्धेसाठी संघबांधणी करण्याचा प्रत्येकाचा विचार असेल,” असे रोहितने सांगितले.