सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी झळकावलेल्या शतकांच्या जोरावर भारताने आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानवर दुसऱ्यांदा मात केली. दुबईच्या मैदानात झालेल्या Super 4 या गटात खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने पाकवर ९ गडी राखून मात केली आणि अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. पाकिस्तानने विजयासाठी दिलेले २३८ धावांचे आव्हान भारताने कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या भागीदारीच्या जोरावर सहज पूर्ण केले.

या सामन्यासाठी सलामीवीर शिखर धवन याला सामनावीर घोषित करण्यात आले. धवनने १०० चेंडूंमध्ये तब्बल १६ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ११४ धावा केल्या. याशिवाय हाँगकाँग या संघाविरुद्ध झालेल्या लढतीतही धवनने शतकी खेळी केली होती. आता भारताच्या Super 4 या गटातील पुढील सामना अफगाणिस्तान संघाविरुद्ध आहे. भारत या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. त्यामुळे या सामन्यात शिखर धवनला विश्रांती देऊन त्याच्या जागी लोकेश राहुल याला संघात स्थान द्यावे, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे.

धवन सध्या फॉर्मात आहे. पण असे असले तरी भारताने आता आपल्या राखीव खेळाडूंना संधी द्यायला हवी. धवन आता चांगली फलंदाजी करत आहे. पण तो इंग्लंडचा दौरा खेळून आला आहे. दुबईमध्ये आता तापमानही जास्त आहे, त्यामुळे खेळाडूंना दुखापती होऊ शकतात. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात धवनला विश्रांती द्यावी आणि त्याच्या जागी लोकेश राहुलला संघात स्थान द्यावे, असे मांजरेकर यांनी म्हणाले.

याशिवाय, जसप्रीत बुमरा यालादेखील विश्रांती द्यायला हवी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.