बांगलादेशचा सलामीवीर लिटन दासने वन-डे क्रिकेटच्या इतिहासातलं आपलं पहिलं वहिलं शतक झळकावलं आहे. भारताविरुद्ध अंतिम सामन्यात खेळताना लिटन दासने १२१ धावांची खेळी केली. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत असताना लिटन दासने मेहदी हसनच्या साथीने बांगलादेशला भक्कम सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये १२० धावांची भागीदारी केली. मात्र मेहदी हसन माघारी परतल्यानंतर बांगलादेशच्या डावाला गळती लागली. लिटन दासने एका बाजूने बाजू लावून धरत आपलं पहिलं वहिलं शतक साजरं केलं. १२१ धावांच्या खेळीत लिटन दासने १२ चौकार आणि २ षटकार लगावले.

अंतिम सामन्यात शतकी खेळी करुन लिटन दासने मानाच्या पंक्तीत स्वतःला स्थान मिळवून दिलं आहे. आशिया चषकाच्या अंतिम फेरीत शतक झळकावणारा लिटन दास पाचवा फलंदाज ठरला आहे. याआधी सनथ जयसूर्या, फवाद आलम, लहिरु थिरीमने, मार्वन अट्टापट्टू या खेळाडूंनी अंतिम सामन्यात शतक झळकावलं आहे.