Asia Cup 2018 Final : आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना.. भारताला विजयासाठी १ चेंडूत १ धाव आवश्यक… दुखापतग्रस्त केदार जाधव स्ट्राईकवर फलंदाजीसाठी उभा… आणि क्षेत्ररक्षकाच्या मागच्या बाजूला चेंडू टोलवत भारताने मिळवलेला विजय…. हा सामना अत्यंत नाट्यमय झाला. रविंद्र जाडेजा आणि भुवनेश्वर कुमारने मधल्या फळीत केलेल्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशचा अंतिम फेरीत ३ गडी राखून पराभव केला आणि आशिया चषकाचं सातवं विजेतेपद मिळवलं. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताने बांगलादेशला २२२ धावांमध्ये गुंडाळलं. धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचा डाव काहीसा गडबडला. पण अखेर भारताने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. हा विजय भारतासाठी प्रेरणादायी असला, तरी बांगलादेशचे चाहते मात्र यावर प्रचंड नाराज झाले.

आजच्या पराभवामुळे आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये किंवा तिरंगी मालिकेत अंतिम सामन्यात पोहोचल्यानंतर पराभूत होण्याची परंपरा बांगलादेशने कायम राखली आहे. २००९ साली बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात तिरंगी मालिकेची अंतिम फेरी रंगली होती. यात बांगलादेशला २ गडी राखून श्रीलंकेने पराभूत केले होते. त्यानंतर आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात बांगलादेशला २०१२ साली पाकिस्तानने तर २०१६ साली भारताने धूळ चारली होती. त्यानंतर २०१८ मध्ये झालेल्या तिरंगी मालिकेत श्रीलंकेने पुन्हा एकदा बांगलादेशला पराभूत केले आणि स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. आणि अखेर २०१८ मध्ये निदाहास तिरंगी मालिकेत भारताने ४ गडी राखून तर आशिया चषकात ३ गडी राखून बांगलादेशचा पराभव केला.