भारताने आशियाई चषक स्पर्धेमध्ये पाकिस्तानवर आठ गडी राखून मोठा विजय मिळवला. गोलंदाजी धुरा संभाळणाऱ्या भुवनेश्वर कुमारने सुरवातीपासूनच भारताला सामन्यावर वर्चस्व मिळवून देण्यास मदत केली. त्यानंतर केदार जाधवने आपल्या फिरकीमध्ये पाकिस्तानी संघाला गुंडाळ्याने प्रतिस्पर्ध्यांना पूर्ण ५० षटकेही खेळता आली नाहीत. आणि पाकिस्तानचा डाव अवघ्या १६२ धावांवर आटोपला.

सामन्याच्या उत्तारार्धामध्ये १६३ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने उरली-सुरली कसर भरून काढली. भारताचे सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी स्फोटक फलंदाजी करत भारताला धडाकेबाज सुरुवात करुन दिली. रोहित शर्मा ५२ धावांवर तर धवन ४६ धावा करून तंबूत परतले. त्यानंतर अंबाती रायडू आणि दिनेश कार्तिक यांनी प्रत्येकी ३१ धावांची खेळी करून विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

धावांच्या दृष्टीने हा लो स्कोअरिंग सामना ठरला तरी या सामन्यामध्ये अनेक विक्रम मोडले गेले. जाणून घेऊयात या सामन्यात झालेल्या विक्रमांबद्दल

१ – पहिल्यांदाच दुबईमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात पाकिस्तानचा संघ २०० धावांच्या आत तंबूत परतला

१ – सहा गोलंदाजांनंतर गोलंदाजी करायला आलेल्या केदार जाधवच्या नावावर एक आगळावेगळा विक्रम नोंदवला गेला. भारताकडून सातवा गोलंदाज म्हणून गोलंदाजी करत तीन विकेट मिळवणारा केदार जाधव हा पहिलाच गोलंदाज ठरला आहे

१ – रोहित शर्माचे या सामन्यातील अर्धशतक हे त्याने केलेले सर्वात जलद अर्धशतक ठरले

१ – आशियाई चषक स्पर्धेत सर्वात जलद अर्धशतक करणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे

१ – भारताने पाकिस्तानवर १२६ चेंडू शिल्लक ठेऊन विजय मिळवला. सर्वाधिक चेंडू शिल्लक ठेऊन भारताने पाकिस्तानवर मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे.

२ – अवघ्या ३६ चेंडूमध्ये अर्धशतक झळकवून रोहित शर्माने आणखीन एक विक्रम आपल्या नावे केला. आशियाई चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही फलंदाजाने झळकावलेले हे दुसरे सर्वात जलद अर्धशतक ठरले.

३ – शोएब मलिक आशियाई चषक स्पर्धेमध्ये धावबाद होण्याची काल तिसरी वेळ होती. यामुळे आता शोएब आशियाई चषक स्पर्धेत सर्वाधिक वेळा धावबाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये दाखल झाला आहे.

४ – रोहित शर्माने पाकिस्तान विरुद्ध झळकावलेले चौथे अर्धशतक ठरले आहे. कोणत्याही फलंदाजाने आशियाई चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

५ – पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाचे नेतृत्व करताना पहिलाच सामना जिंकून देणारा रोहित शर्मा हा पाचवा कर्णधार ठरला आहे. याआधी बिशनसिंग बेदी, सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, एम. एस. धोनी यांनी हा पराक्रम केला होता.