मोक्याच्या क्षणी अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी केलेल्या हाराकिरीमुळे Super 4 गटातील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानवर ३ धावांनी विजय मिळवला. अबुधाबीच्या मैदानात खेळवला गेलेला हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला, मात्र मुस्तफिजूर रेहमानने केलेल्या चतुर गोलंदाजीपुढे अफगाण फलंदाज फटकेबाजी करु शकले नाहीत, अखेर बांगलादेशने सामन्यात बाजी मारली.

अवश्य वाचा – Asia Cup 2018 : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात तब्बल १६ विक्रमांची नोंद, जाणून घ्या !

नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या बांगलादेशची सुरुवात थोडी खराब झाली. दोन फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर सलामीवीर लिटन दासने मुशफिकूर रहिमच्या जोडीने छोटेखानी भागीदारी करुन संघाचा डाव सावरला. अखेर तळातल्या फलंदाजांपैकी इमरुन कायस आणि मेहमद्दुला जोडीने सहाव्या जोडीसाठी १२८ धावांची शतकी भागीदारी केली. इमरुन कासयने ७२ तर मेहमद्दुलाने ७४ धावा केल्या. या खेळीच्या जोरावर बांगलादेशने २०० धावांचा टप्पा ओलांडला. अफगाणिस्तानकडून अफताब आलमने ३ बळी घेतले.

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानचे दोन फलंदाज तात्काळ माघारी परतले. मात्र यानंतर सलामीवीर मोहम्मद शेहजाद आणि हशमतुल्ला शहिदी यांनी ६३ धावांची भागीदारी करुन संघाचं आव्हान सामन्यात कायम राखलं. यानंतरही झालेल्या एका अर्धशतकी भागीदारीमुळे अफगाणिस्तान सामन्यात जिंकणार असं चित्र निर्माण झालं होतं. मात्र मोक्याच्या क्षणी अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी मोठा फटका खेळण्याच्या नादात आपली विकेट गमावली. मुस्तफिजूरच्या गोलंदाजीवर अखेरच्या चेंडूवर अफगाणिस्तानला विजयासाठी ४ धावांची गरज होती, मात्र यातही अपयशी ठरल्यामुळे अफगाणिस्तानचं स्पर्धेतलं आव्हान जवळपास संपुष्टात आलेलं आहे. ७४ धावा व १ बळी घेणाऱ्या मेहमद्दुलाला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं.

अवश्य वाचा – Asia Cup 2018 : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ‘गब्बर’चा अनोखा विक्रम, दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान