Asia Cup 2018 Ind vs Pak : स्पर्धेत भारताने हॉंगकॉंगवर कसाबसा २६ धावांनी विजय मिळवला. मात्र आज भारताची झुंज पाकिस्तानशी होणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत दारुण पराभव पत्करल्यानंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान १५ महिन्यांनंतर एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

संपूर्ण विश्वाचे लक्ष या सामन्याकडे आहे. भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे व लढतीच्या विशेष दडपणामुळे या सामन्याला क्रिकेटच्या व्यासपीठावर अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच या लढतीत विजय मिळवून चॅम्पियन्स करंडकातील पराभवाची परतफेड करण्याचा व अब्जावधी भारतीयांना आनंदाची खास पर्वणी देण्याचा निर्धार भारतीय संघाचा असेल.

या सामन्याच्या निकालाबाबत विविध अंदाज वर्तवण्यात येत आहेत. या दरम्यान, फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याने या सामन्यात धोनीमुळे पाकिस्तानवर भारत भारी पडू शकतो असे वक्तव्य केले आहे. पाकिस्तानचा संघ हा तरुण आणि नवोदित खेळाडूंनी परिपूर्ण आहे. पण त्यात अनुभवाचा अभाव आहे. तर दुसरीकडे भारतीय संघाकडे प्रतिभा आहे. त्यांचे अनेक खेळाडू हे अनुभवी आहेत. क्रिकेटच्या तीनही प्रकारात भारत अनुभवाने परिपूर्ण आहे. महेंद्रसिंग धोनीचा अनुभव हा भारताला पाकिस्तानपेक्षा सरस ठरण्यास मदत करेल, असे तो म्हणाला.

दरम्यान, भारताचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर यांची जुगलबंदी पाहण्याची प्रेक्षकांना फार उत्सुकता असते. मात्र कोहलीने स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे रोहित शर्माकडे भारताचे नेतृत्व सोपवण्यात आले. त्यामुळे कोहलीच्या अनुपस्थितीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणारा रोहित युवा खेळाडूंची योग्य सांगड कशारीतीने घालतो, यावर सामन्याचा निकाल अवलंबून असेल, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.