खेळाडूंच्या दुखापतीने भेडसावलेल्या भारतासमोर बांगलादेशचे कडवे आव्हान

पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारल्यामुळे आत्मविश्वास बळावलेल्या भारतीय संघाला शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या ‘सर्वोत्तम चार’ फेरीच्या पहिल्या लढतीत लढाऊ वृत्तीच्या बांगलादेशशी सामना करायचा आहे. हार्दिक पंडय़ा, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल या तिघांनाही दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागल्यामुळे कर्णधार रोहित शर्मासमोर नव्याने संघाची व्यूहरचना आखण्याचे आव्हान असेल.

डावखुरा वेगवान गोलंदाज खलिल अहमदचे बांगलादेशविरुद्ध संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. भुवनेश्वर कुमारने सलग दोन सामने खेळल्यामुळे त्याला विश्रांती देऊन पदार्पणात छाप पाडणाऱ्या खलिलचा पर्याय उपयुक्त ठरू शकतो. सलामीवीर म्हणून आतापर्यंत आपली जबाबदारी  चोख बजावणारे रोहित आणि शिखर धवन, शिवाय पाकिस्तानविरुद्ध चांगली खेळी करणारे अंबाती रायुडू व दिनेश कार्तिक यांचे संघातील स्थान निश्चित आहे. मात्र माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला संघ व्यवस्थापन वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्याचा निर्णय घेणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

दुसरीकडे गेल्या काही वर्षांत बांगलादेशने एकदिवसीय क्रिकेटमध्ये कौतुकास्पद प्रगती केलेली आहे. कर्णधार मश्रफी मोर्तझा, अनुभवी अष्टपैलू शकिब-अल-हसन, मुशफिकर रहिम यांच्या समावेशामुळे बांगलादेशचा संघ समतोल वाटत आहे. मुस्तफिझूर रेहमान, रुबेल हसन आणि फिरकीपटू मेहदी हसन यांच्यावर गोलंदाजीची धुरा आहे. गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्ध सामना खेळल्यामुळे शुक्रवारी बांगलादेशच्या खेळाडूंच्या तंदुरुस्तीचीही कसोटी असणार आहे.

याव्यतिरिक्त, भारत-बांगलादेश सामन्याच्या वेळीच अबू धाबी येथे अफगाणिस्तानचा संघ पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. सर्वोत्तम चार फेरीत सर्वाधिक सामने जिंकणारे दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.

हार्दिकसह शार्दूल, अक्षर यांनाही दुखापत

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना अचानक खाली कोसळल्यामुळे सामना अर्धवटच सोडणारा अष्टपैलू हार्दिक पंडय़ा आता उर्वरित संपूर्ण स्पर्धेला मुकणार आहे. त्याशिवाय वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर व फिरकीपटू अक्षर पटेल हे दोघेही दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. पंडय़ाच्या जागी दीपक चहरची संघात निवड करण्यात आली असून, शार्दूल व अक्षरच्या जागी अनुक्रमे सिद्धार्थ कौल व रवींद्र जडेजा यांना संघात स्थान देण्यात आले आहे.

संघ

  • भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, मनीष पांडे, केदार जाधव, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, खलिल अहमद, सिद्धार्थ कौल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, दीपक चहर.
  • बांगलादेश : मशरफी मोर्तझा (कर्णधार), शकिब-अल-हसन, तमिम इक्बाल, मोहम्मद मिथुन, लिटन दास, मुशफिकर रहिम, अरिफुल हक, महमदुल्ला रियाज, मोसाद्देक हुसैन, नजमुल हुसैन, मेहदी हसन, नजमुल इस्लाम, रुबेल हसन, मुस्तफिजूर रहमान, अबू हैदर.

सामन्याची वेळ : सायंकाळी ५ वा.

थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स १ आणि ३