कर्णधार रोहित शर्माने सलग दुसऱ्या सामन्यात झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने बांगलादेशचा Super 4 गटातील पहिल्या सामन्यात पराभव केला आहे. ७ गडी राखून विजय मिळवत भारताने या स्पर्धेत सध्याच्या घडीला आपणच सर्वोत्तम असल्याचं पून्हा एकदा दाखवून दिलं आहे. बांगलादेशने दिलेलं १७४ धावांचं आव्हान भारताने रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर पूर्ण केलं.  दुसरीकडे रोहित शर्माने नाबाद ८३ धावांची अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी सावध पवित्रा घेत, योग्य वेळी बांगलादेशी गोलंदाजांवर हल्लाबोल करत भारताचं सामन्यातं आव्हान कायम राखलं. बांगलादेशकडून शाकिब अल हसन, मश्रफी मोर्ताझा आणि रुबेल हसन यांना प्रत्येकी १-१ बळी मिळाला.

त्याआधी, कर्णधार मश्रफी मोर्ताझा आणि मेहदी हसनमध्ये झालेल्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर, बांगलादेशने Super 4 गटातील पहिल्या सामन्यात भारतासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. ४९.१ षटकात बांगलादेशचा संघ १७३ धावांपर्यंत मजल मारु शकला. पाकिस्तानविरुद्ध सामन्याप्रमाणेच या सामन्यातही भारतीय गोलंदाजांनी चांगला मारा केला. रविंद्र जाडेजा- भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरहाने केलेल्या माऱ्यासमोर बांगलादेशचे गोलंदाज तग धरु शकले नाहीत.

सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या बांगलादेशची सुरुवात अतिशय खराब झाली. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रित बुमराहने दोन्ही सलामीवीरांना एकामागोमाग एक माघारी धाडत बांगलादेशला धक्का दिला. यानंतर हार्दिक पांड्याच्या जागेवर संघात स्थान मिळालेल्या रविंद्र जाडेजाने बांगलादेशी फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिल्यामुळे बांगलादेश मोठी धावसंख्या उभारतो की नाही असं वाटायला लागलं होतं. मात्र आठव्या विकेटसाठी मश्रफी मोर्ताझा आणि मेहदी हसनने केलेल्या भागीदारीमुळे सामन्याचं चित्र पालटलं. बांगलादेशी फलंदाजांनी शेवटच्या काही तासांमध्ये चांगल्या धावा जमवत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. रविवारी भारताचा सामना पुन्हा एकदा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.

 

Live Blog

00:10 (IST)22 Sep 2018
रोहित शर्माकडून विजयाची औपचारिकता पूर्ण

रोहितने विजयाची औपचारिकता पूर्ण करत Super 4 गटात भारताला पहिला विजय मिळवून दिला

00:09 (IST)22 Sep 2018
विजयासाठी अवघ्या काही धावांची गरज असताना भारताला तिसरा धक्का

विजयी फटका मारण्याच्या नादात महेंद्रसिंह धोनी मश्रफी मोर्ताझाच्या गोलंदाजीवर माघारी

22:48 (IST)21 Sep 2018
भारताला दुसरा धक्का, रायडू बाद

रुबेल हुसेनच्या गोलंदाजीवर मुशफिकूर रहिमकडे झेल देत रायडू माघारी. भारताला दुसरा धक्का

22:42 (IST)21 Sep 2018
कर्णधार रोहित शर्माचं अर्धशतक

रोहित शर्माचं अर्धशतक, भारताने ओलांडला १०० धावांचा टप्पा

22:15 (IST)21 Sep 2018
भारताची जमलेली जोडी फुटली, गब्बर माघारी

पहिल्या विकेटसाठी झालेल्या ६१ धावांच्या भागीदारीनंतर भारताची जमलेली जोडी फुटली. शाकिब अल हसनच्या गोलंदाजीवर स्विपचा फटका खेलताना शिखर धवन माघारी

22:13 (IST)21 Sep 2018
भारतीय सलामीवीरांकडून डावाची सावध सुरुवात

रोहित शर्मा - शिखर धवन जोडीकडून डावाची सावध सुरुवात, दोन्ही फलंदाजांनी संघाला ५० धावसंख्येच्या पुढे नेलं.

20:42 (IST)21 Sep 2018
अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर मुस्तफिजूर माघारी, बांगलादेशचा डाव संपुष्टात

बुमराहच्या गोलंदाजीवर मुस्तफिजूर माघारी, बांगलादेशचा डाव १७३ धावांमध्ये आटोपला. भारताला विजयासाठी १७४ धावांचं आव्हान

20:29 (IST)21 Sep 2018
बुमराहने दूर केला मेहदी हसनचा अडसर, बांगलादेशचा नववा गडी माघारी

मोर्ताझा माघारी परतल्यानंतर दुसऱ्याच षटकात मेहदी हसन बुमराहच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना माघारी

20:27 (IST)21 Sep 2018
भुवनेश्वरने जोडीली बांगलादेशची जोडी, मोर्ताझा बाद

कर्णधार मश्रफी मोर्ताझा भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर माघारी, बांगलादेशचा आठवा गडी माघारी

20:26 (IST)21 Sep 2018
मश्रफी मोर्ताझा - मेहदी हसन जोडीमध्ये अर्धशतकी भागीदारी

सुरुवातीला झालेल्या पडझडीनंतर, कर्णधार मश्रफी मोर्ताझा आणि मेहदी हसन जोडीने फटकेबाजी करत बांगलादेशचा डाव सावरला. दोघांमध्येही आठव्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी. बांगलादेशने ओलांडला १५० धावांचा टप्पा

19:28 (IST)21 Sep 2018
लागोपाठ मोसादक हुसैन माघारी, बांगलादेशचा सातवा गडी माघारी

रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात मोसादक धोनीकडे झेल देऊन माघारी. जाडेजाचा सामन्यातला चौथा बळी

19:26 (IST)21 Sep 2018
अखेर बांगलादेशची जोडी फोडण्यात भारताला यश, मेहमद्दुला माघारी

भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर मेहमद्दुला माघारी. वास्तविक पाहता मेहमद्दुलाची विकेट ही दुर्दैवी म्हणावी लागेल, मेहमद्दुलाच्या बॅटची कड घेऊन बॉल पॅडवर आदळला होता. मात्र ही बाब पंचांच्या नजरेतून सुटल्यामुळे त्यांनी भारताचं पायचीतच अपील उचलून धरलं

19:25 (IST)21 Sep 2018
मेहमद्दुला आणि मोसादक हुसेनमध्ये छोटेखानी भागीदारी, बांगलादेशचा डाव सावरला

सहाव्या विकेटसाठी बांगलादेशच्या दोन्ही फलंदाजांनी ३६ धावांची छोटेखानी भागीदारी केली. या जोरावर बांगलादेशने १०० धावांचा टप्पा ओलांडला

18:30 (IST)21 Sep 2018
बांगलादेशचा आणखी एक फलंदाज माघारी, जाडेजाच्या खात्यात तिसरा बळी

रविंद्र जाडेजाला रिव्हर्स स्विपचा फटका खेळण्याच्या नादात मुशफिकुर रहिम झेलबाद, बांगलादेशचा निम्मा संघ माघारी

18:19 (IST)21 Sep 2018
जाडेजाच्या फिरकीच्या जाळ्यात आणखी एक फलंदाज

मोहम्मद मिथून जाडेजाच्या गोलंदाजीवर पायचीत, पंचांनी दिलेल्या निर्णयाला बांगलादेशचं आव्हान. मात्र तिसऱ्या पंचांच्या पाहणीतही मिथून बाद असल्याचं समोर. बांगलादेशचा चौथा गडी माघारी

17:53 (IST)21 Sep 2018
जाडेजाच्या फिरकीची जादू, बांगलादेशला तिसरा धक्का

रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर स्विपचा फटका खेळताना शाकिब अल हसन, शिखर धवनकडे झेल देऊन माघारी. बांगलादेशचा तिसरा गडी तंबूत परतला

17:52 (IST)21 Sep 2018
शाकिब अल हसन - मुशफिकुर रहिम जोडीकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न

शाकिब - मुशफिकुर जोडीने काही चांगले फटके खेळून बांगलादेशचा डाव सुरुवातीच्या पडझडीनंतर काही प्रमाणात सावरला

17:30 (IST)21 Sep 2018
बांगलादेशला लागोपाठ दुसरा धक्का, नझमुल हुसेन बाद

जसप्रीत बुमरहाच्या गोलंदाजीवर जोरदार फटका खेळण्याच्या प्रयत्नात स्लिपमध्ये झेल देत नझमुल बाद. बांगलादेशचा दुसरा गडी माघारी

17:23 (IST)21 Sep 2018
बांगलादेशला पहिला धक्का, लिटन दास माघारी

भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात लिटन दास झेलबाद. बांगलादेशचा पहिला गडी माघारी

17:04 (IST)21 Sep 2018
भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जखमी हार्दिक पांड्याऐवजी भारतीय संघात रविंद्र जाडेजाला जागा देण्यात आलेली आहे.