दुबईच्या रणांगणावर भारत-पाकिस्तान यांच्यात घमासान रंगणार

दुबई : गेल्या वर्षी झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत दारुण पराभव पत्करल्यानंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान बुधवारी एकमेकांसमोर उभे ठाकतील, तेव्हा संपूर्ण विश्वाचे लक्ष या सामन्याकडे वेधले जाईल. भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे व लढतीच्या विशेष दडपणामुळे या सामन्याला क्रिकेटच्या व्यासपीठावर अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच या लढतीत विजय मिळवून चॅम्पियन्स करंडकातील पराभवाची परतफेड करण्याचा व अब्जावधी भारतीयांना आनंदाची खास पर्वणी देण्याचा निर्धार भारतीय संघाचा असेल.

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत सपाटून मार खाल्ल्यानंतर आशिया चषकात भारतीय संघ कामगिरी उंचावतो का, याची सर्वानाच उत्सुकता आहे. त्यातच हाँगकाँगविरुद्धच्या सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी ही लढत असल्यामुळे भारतीय खेळाडूंची तंदुरुस्तीही येथे पणाला लागेल.

कोहलीची अनुपस्थिती जाणवणार?

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर यांची जुगलबंदी पाहण्याची प्रेक्षकांना फार उत्सुकता असते. मात्र कोहलीने स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे रोहित शर्माकडे भारताचे नेतृत्व सोपवण्यात आले. त्यामुळे कोहलीच्या अनुपस्थितीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणारा रोहित युवा खेळाडूंची योग्य सांगड कशारीतीने घालतो, यावर सामन्याचा निकाल अवलंबून असेल.

मध्यक्रमाची चिंता

मागील काही काळापासून भारतीय संघ व्यवस्थापन चौथ्या क्रमांकावर कोणत्या फलंदाजाला फलंदाजीसाठी धाडावे याचे उत्तर शोधत आहे. मात्र दिनेश कार्तिक, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, लोकेश राहुल, सुरेश रैना यांसारखे विविध पर्याय वापरूनदेखील भारतासमोरील प्रश्नचिन्ह कायम आहे. त्यामुळे या स्पर्धेत यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी किंवा केदार जाधव यापैकी एकाला चौथ्या क्रमांकावर बढती मिळू शकते.

भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन

वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा दुखापतीतून सावरल्यामुळे भारतीय गोलंदाजीची बाजू बळकट झाली आहे. जसप्रीत बुमराच्या साथीने भुवनेश्वर व शार्दूल ठाकूर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर कुलदीप यादव व युजवेंद्र चहल फिरकीची धुरा वाहतील.

संभाव्य संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, अंबाती रायुडू, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंडय़ा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, शार्दूल ठाकूर, खलिल अहमद.

पाकिस्तान : सर्फराज अहमद (कर्णधार), इमाम-उल-हक, फखर जमान, बाबर आझम, शोएब मलिक, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद आमिर, फहीम अशरफ, हसन अली, उस्मान खान, शान मसूद, हॅरिस सोहेल, शाहिन आफ्रिदी, जुनैद खान.

* सामन्याची वेळ : सायंकाळी ५ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, ३

१२९

भारत-पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत १२९ एकदिवसीय सामने खेळवण्यात आले असून पाकिस्तानचे पारडे जड आहे. त्यांनी भारताला ७३ सामन्यांत नमवले असून भारताने ५२ लढतीत विजय मिळवला आहे. उर्वरित चार सामने अनिर्णीत राहिले आहेत.

१२

आशिया चषकात भारत-पाकिस्तान आतापर्यंत १२ वेळा समोरासमोर आले असून यांपैकी सहा सामन्यांत भारताने विजय मिळवला असून पाकिस्तानला पाच सामन्यांत यश मिळाले आहे, तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे.

भारताने सहा वेळा स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले असून पाकिस्तानने दोनच वेळा अशी कामगिरी केली आहे.