X

Asia Cup 2018 : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात तब्बल १६ विक्रमांची नोंद, जाणून घ्या !

शिखर-रोहितची द्विशतकी भागीदारी

सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्माने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने आशिया चषकात पाकिस्तानवर सलग दुसऱ्यांदा मात केली. Super 4 गटातील सामन्यात भारताने पाकिस्तानचा ९ गडी राखून हरवलं. पाकिस्तानने दिलेलं २३८ धावांचं आव्हान पार करताना भारताच्या सलामीच्या जोडीने केलेली द्विशतकी भागीदारी ही भारतीय डावाचं वैशिष्ट्य ठरली. या विजयासह भारताने आशिया चषकाच्या अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क केलं आहे. दरम्यान भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात अनेक विक्रमांचीही नोंद करण्यात आली आहे.

अवश्य वाचा – हिटमॅन-गब्बरच्या शतकी खेळीपुढे पाकिस्तानची धुळधाण, ९ गडी राखून विजय मिळवत भारत अंतिम फेरीत

१ – पाकिस्तानविरुद्ध वन-डे क्रिकेटमध्ये सलामीच्या फलंदाजांनी केलेल्या सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम आता शिखर-रोहित जोडीच्या नावावर. रोहित-शिखरने २१० धावांची भागीदारी करत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकर-सौरव गांगुली जोडीच्या नावावर होता. (१९९८ साली १५९ धावांची भागीदारी)

१ – आशिया चषकात सलामीच्या जोडीने केलेल्या सर्वोत्तम भागीदारीचा विक्रमही शिखर धवन-रोहित शर्मा जोडीच्या नावावर. याआधी सचिन तेंडुलकर-मनोज प्रभाकर जोडीने १९९५ साली शारजाच्या मैदानात श्रीलंकेविरुद्ध १६१ धावांची भागीदारी केली होती.

१ – धावांचा पाठलाग करताना शिखर-रोहित जोडीने केलेली २१० धावांची भागीदारी ही भारताच्या वन-डे क्रिकेट इतिहासातली सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे. याआधी विरेंद्र सेहवाग-गौतम गंभीर जोडीच्या नावावर हा विक्रम जमा होता (२००९ सालात न्यूझीलंडविरुद्ध १५९ धावांची भागीदारी)

२ – रोहित आणि शिखर जोडीचा अपवाद वगळता केवळ २ भारतीय जोड्यांच्या नावावर सर्वाधिक शतकी भागीदाऱ्या जमा आहेत. सचिन तेंडुलकर-सौरव गांगुली जोडीच्या नावावर २१ तर विराट कोहली-रोहित शर्मा जोडीच्या नावावर १४ शतकी भागीदाऱ्या जमा आहेत. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात रोहित-शिखर जोडीने केलेली शतकी भागीदारी ही त्यांची १३ वी भागीदारी ठरली.

२ – वन-डे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात कमी सामन्यांमध्ये ५० बळी घेणाऱ्यांच्या यादीत युझवेंद्र चहल दुसऱ्या स्थानावर. चहलने ३० सामन्यांमध्ये ५० बळी घेतले आहेत, या यादीत कुलदीप यादव पहिल्या स्थानावर असून कुलदीपने २४ सामन्यांमध्ये ५० बळी घेतले आहेत.

२ – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० पेक्षा जास्त षटकार मारणारा रोहित शर्मा धोनीनंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

४ – आशिया चषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा शोएब मलिक चौथ्या स्थानावर. या यादीत श्रीलंकेचा माजी फलंदाज सनथ जयसूर्या पहिल्या, लंकेचा माजी यष्टीरक्षक कुमार संगकारा दुसऱ्या तर भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर तिसऱ्या स्थानावर आहे.

३ – वन-डे क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्ध एकाच सामन्यात दोन शतकं झळकावण्याची भारताची ही तिसरी वेळ ठरली आहे. याआधी सचिन-सिद्धु जोडीने १९९६ साली तर सेहवाग-द्रविड जोडीने २००५ साली ही किमया साधली होती.

३ – सर्वात कमी डावांमध्ये १५ वं वन-डे शतक ठोकणारा शिखर धवन तिसरा फलंदाज ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला या यादीमध्ये ८६ डावांसह पहिल्या, विराट कोहली १०६ डावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

४ – वन-डे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतकी भागीदाऱ्या करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा-शिखर धवन जोडी चौथ्या स्थानावर. या जोडीच्या नावावर १३ शतकी भागीदाऱ्या जमा आहेत. या यादीमध्ये सचिन-गांगुली जोडी २१ भागीदाऱ्यांसह पहिल्या, गिलख्रिस्ट-हेडन जोडी १६ शतकांसह दुसऱ्या तर ग्रिनीज-हेन्स जोडी १५ शतकी भागीदाऱ्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

४ – सर्वात जलद १९ शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा चौथ्या स्थानावर. रोहितने १८१ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. या यादीमध्ये हाशिम आमला १०४ डावांसह पहिल्या स्थानावर, विराट कोहली १२४ डावांसह दुसऱ्या स्थानावर तर एबी डिव्हीलियर्स १७१ डावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

५ – वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद ७ हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा पाचव्या स्थानावर. या यादीतही हाशिम आमला १५० डावांसह पहिल्या स्थानावर आहे. शिखरने १८१ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.

५ – भारताकडून सर्वात जलद ५० बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत युझवेंद्र चहल पाचव्या स्थानावर. चहलने ३० सामन्यांमध्ये ही किमया साधली आहे. या यादीत अजित आगरकर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी हे गोलंदाज चहलच्या पुढे आहेत.

७ – आशिया चषक, विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी यासारख्या महत्वाच्या स्पर्धांमध्ये शिखर धवनच्या नावावर २६ डावांमध्ये ७ शतकांची नोंद आहे. या यादीमध्ये जयसूर्या, संगकारा, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली हे फलंदाज धवनच्या पुढे आहेत.

७ – आशिया चषकातल्या इतिहासातली ही सातवी द्विशतकी भागीदारी ठरली आहे. धवन-रोहित ही जोडी अशी कामगिरी करणारी तिसरी भारतीय जोडी ठरली आहे.

अवश्य वाचा – Ind vs Pak : DRS चा निर्णय घेताना धोनीची चतुराई, पाकिस्तानचा इमाम उल हक तंबूत

२० – वन-डे क्रिकेटमध्ये सलामीवीर या नात्याने ५ हजार धावा करणारा रोहित २० वा खेळाडू ठरला आहे. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. या कामगिरीमुळे रोहितला सचिन, गांगुली, सेहवाग यासारख्या मानाच्या खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळणार आहे.

  • Tags: ind-vs-pak, आशिया कप - 2018,