आशिया चषक स्पर्धा ही सध्या अंतिम टप्प्यात आहे. शुक्रवारी या स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये होणार असून त्यातच आशियाचा ‘किंग’ कोण हे ठरणार आहे. या स्पर्धेत पहिल्याच सामन्यात बांगलादेशने बलाढय श्रीलंकेला पराभूत करून आपली विजयाची दावेदारी सिद्ध केली होती. पण या उलट श्रीलंकेने मात्र या स्पर्धेत चाहत्यांना प्रचंड निराश केले. अफगाणिस्तानच्या संघाकडूनही त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

या पराभवानंतर अपेक्षेप्रमाणे अँजेलो मॅथ्यूज यांच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले आणि दिनेश चंडिमल यांच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. पण मॅथ्यूजला पदावरून काढण्यामागे केवळ पराभव हे कारण नसून त्याचा मैदानावरील आळशीपणाही कारणीभूत ठरला आहे.

बांगलादेश आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे मॅथ्यूजची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली असा अंदाज प्रत्येक चाहत्याने बांधला होता. मात्र श्रीलंकेच्या प्रशिक्षकांनी मॅथ्यूजला पदावरून दूर करण्यामागचे खरे कारण सांगितले. श्रीलंकेचे प्रशिक्षक चंडिका हतुरसिंघे म्हणाले की आम्ही आशिया चषकातील दोन्ही सामने पराभूत झालो, म्हणून मॅथ्यूजची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आलेली नाही. तर धावा घेत असताना मॅथ्यूजने बराच आळशीपणा केला. त्यामुळे संघाच्या धावा कमी झाल्या आणि अन्य फलंदाजांवर दडपण आले, त्यामुळे मॅथ्यूजला आम्ही कर्णधारपदावरून दूर केले आहे.

मॅथ्यूजमुळे आतापर्यंत श्रीलंकेचे एकूण ६४ बळी धावबाद झाले असून यापैकी ४९ वेळा मॅथ्यूजच्या समोर असलेल्या फलंदाजाला तंबूत परतावे लागले आहे, अशी निराशाजनक आकडेवारीही त्यांनी यावेळी सांगितली.