महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने तब्बल दोन वर्षांच्या कालावधीने पुनरागमन केलं आहे. आशिया चषकातील Super 4 गटात भारताचा शेवटचा सामना अफगाणिस्तानशी होतो आहे. मात्र भारताने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठल्यामुळे आजच्या सामन्यात भारताच्या राखीव खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. याचसोबत कर्णधार रोहितला विश्रांती देऊन नेतृत्वाची जबाबदारी धोनीच्या खांद्यावर देण्यात आली आहे. तब्बल ६९६ दिवसांनी धोनी भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवणार आहे.

अवश्य वाचा – Asia Cup 2018 : …आणि धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम

महत्वाची गोष्ट म्हणजे भारताचा कर्णधार या नात्याने धोनीचा हा २०० वा सामना असणार आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगने, ऑस्ट्रेलियाचं २३० सामन्यांमध्ये नेतृत्वं केलं आहे तर स्टिफन फ्लेमिंगने २१८ सामन्यांमध्ये न्यूझीलंडचं नेतृत्व केलं आहे. नाणेफेकीदरम्यान धोनीने, भारतीय संघाचं नेतृत्व करायला मिळणं हा निव्वळ नशिबाचा भाग असल्याचं नमूद केलं. मात्र २०० वा सामन्यात भारताचं प्रतिनिधीत्व करत असताना धोनीला नाणेफेकीत मात्र अपयश आलंय. त्यामुळे २०० व्या सामन्यात धोनी भारताला विजय मिळवून देतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.