पाकिस्तान-बांगलादेश आज विजयासाठी सर्वस्व पणाला लावणार

अबू धाबी : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपली आहे. अव्वल चार फेरीत सलग दोन विजयांनिशी दिमाखात अंतिम फेरी गाठणाऱ्या भारतासमोर शुक्रवारी कोणत्या संघाचे आव्हान उभे ठाकणार, याचे उत्तर क्रीडारसिकांना बुधवारी मिळणार आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या या सामन्याला उपांत्य फेरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

बांगलादेश व पाकिस्तान या दोन्ही संघांना अव्वल चार फेरीत भारताकडून पराभव स्वीकारावा लागला. विशेषत: पाकिस्तानला भारताने साखळी फेरीतही धूळ चारली. अनुभवी फलंदाज शोएब मलिकवर पाकिस्तानची फलंदाजी सर्वाधिक अवलंबून आहे. सलामीवीर फखर झमान आणि इमाम-उल-हक यांनी अफगाणिस्तानविरुद्धचा सामना वगळता एकाही लढतीत चांगली फलंदाजी केलेली नाही. मात्र वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरचा हरवलेला फॉर्म पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे कर्णधार सर्फराज अहमद त्याला वगळण्याचा धाडसी निर्णय घेणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

दुसरीकडे बांगलादेशने गेल्या सामन्यात अफगाणिस्तानवर शेवटच्या षटकात विजय मिळवून आव्हान कायम राखले. प्रत्येक सामन्यात त्यांच्यासाठी संघातील एका तरी खेळाडूने मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावली आहे. प्रामुख्याने गोलंदाजीत मुस्तफिजुर रेहमान व अबू हैदर यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. त्यामुळे, या सामन्यातही पाकिस्तानला रोखण्यासाठी बांगलादेशी गोलंदाज सज्ज आहेत. एकूणच कागदावर जरी पाकिस्तानचा संघ वरचढ वाटत असला तरी बांगलादेशला कमी लेखणे त्यांना नक्कीच महागात पडू शकते.

* सामन्याची वेळ :  सायंकाळी ५ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि ३