भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा क्रीडाप्रेमींसाठी एखाद्या उत्सवाप्रमाणे असतो. चाहते सर्व कामे बाजूला ठेवून हा सामना पाहतात. काही चाहते हा सामना पाहण्यासाठी थेट स्टेडियममध्येही धडकतात. आशिया चषकातील भारत-पाक सामना हा दुबईमध्ये होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाचा एक चाहता चक्क आपली बाईक विकणार आहे आणि त्याच्यातून मिळालेल्या पैशातून सामना पाहायला जाणार आहे.

टीम इंडियाचा हा जबरा फॅन म्हणजे सचिन तेंडुलकरचा परमभक्त सुधीर.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला टीम इंडियाला चिअर करण्यासाठी दुबईला जायचे आहे. पण दुबईमध्ये जाण्यासाठी त्याच्याकडे सध्याच्या घडीला पैसे नसल्यामुळे त्याने आपली बाईक विकण्याचा निर्णय घेतला आहे. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत प्रत्येकाला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहायचा आहे. त्यालाही दुबईमध्ये काहीही करून जायचेच आहे. दुबईला जाण्याचे तिकीट आणि व्हिजा याचा खर्च सुमारे ३० हजार रुपये आहे. पण त्याच्याकडे सध्या एवढे पैसे नाहीत. त्यामुळेच त्याने आपली बाईक विकण्याचा निर्णय घेतला आहे. बाईक विकून त्याला अंदाजे ३५ हजार रुपये मिळणार आहेत, असे सांगितले जात आहे.

‘मी जेव्हा-जेव्हा मदत मागितली, तेव्हा मला सचिन कधीच नाही म्हणाला नाही. पण त्यांच्याकडे सारखी मदत मागणे योग्य दिसत नाही. सध्याच्या घडीला ते लंडनमध्ये आहेत. माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, पण बाईक विकून मला ते पैसे मिळू शकतात. त्यामुळे मी आता स्व-खर्चाने दुबईला जायचा निर्णय घेतला आहे, असे सुधीर याने सांगितले.