आशिया चषकाच्या सुरुवातीलाच भारताला दुबळ्या हाँग काँगविरुद्ध विजय मिळवण्यासाठी चांगलच झुंजाव लागतं. अवघ्या २६ धावांनी भारताने विजय मिळवत पुढील फेरीत आपलं स्थान पक्क केलं. भारताने दिलेलं २८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हाँग काँगने चांगली लढत दिली, मात्र त्यांची झुंज अपयशी पडली. भारताकडून सलामीवीर शिखर धवनने आपल्या वन-डे कारकिर्दीतं झळकावलेलं १४ वं शतक झळकावलं. मोठ्या प्रयत्नानंतर मिळालेल्या या विजयानंतर भारतासमोर आता पाकिस्तानचं आव्हान असणार आहे. मात्र हाँग काँगविरुद्धच्या सामन्यात तब्बल १० विक्रमांची नोंद करण्यात आली.

१ – वन-डे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद ५० बळी घेणाऱ्या फिरकीपटूंच्या यादीत कुलदीप यादव पहिल्या स्थानावर पोहचला आहे. कुलदीपने अवघ्या २४ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. याआधी भारताचा फिरकीपटू अमित मिश्रा याच्या नावावर हा विक्रम जमा होता, त्याने ३२ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या यादीत आता श्रीलंकेचा अंजता मेंडीस कुलदीपच्या पुढे आहे, त्याने १९ सामन्यांमध्ये ५० बळी घेतले होते.

१ – हाँग काँगच्या अंशुमन रथ आणि निझाकत खान यांनी सलामीला केलेली १७४ धावांची भागीदारी, हाँग काँगसाठी सर्वोत्तम भागीदारी ठरलेली आहे.

अवश्य वाचा – Asia Cup 2018 IND vs HK : भारताचा हाँगकाँगवर रडतखडत विजय

२ – सर्वात जलद ५० बळी घेणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत कुलदीप यादव दुसऱ्या स्थानावर. अजित आगरकरने २३ सामन्यांमध्ये वन-डे क्रिकेटमध्ये ५० बळी घेतले होते, कुलदीपने २४ सामन्यांत हा विक्रम केला आहे. डावखुऱ्या गोलंदाजांच्या यादीतही कुलदीपने दुसरं स्थान पटकावलं आहे. न्यूझीलंडचा मिचेल मॅक्लेनघन या यादीत पहिल्या स्थानावर आहे.

३ – शिखर धवनचा अपवाद वगळता फक्त ३ फलंदाजांनी कमी डावांमध्ये १४ वन-डे शतकं झळकावली आहेत. शिखरने १०५ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. या यादीत हाशिम आमला ८४ डावांसह पहिल्या स्थानावर, डेव्हिड वॉर्नर ९८ डावांसह आणि विराट कोहली १०३ डावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

४ – भारतीय सलामीवीरांकडून सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या यादीत शिखर धवन चौथ्या स्थानावर पोहचला आहे. शिखरने या शतकासह विरेंद्र सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. या यादीमध्ये सचिन तेंडुलकर ४५ शतकांसह पहिल्या स्थानी, सौरव गांगुली १९ शतकांसह दुसऱ्या स्थानी तर रोहित शर्मा १६ शतकांसह तिसऱ्या स्थानी आहे.

९ – महेंद्रसिंह धोनीची वन-डे क्रिकेटमध्ये शून्यावर बाद होण्याची ही नववी वेळ ठरली.

९२ – भारताविरुद्ध आयसीसीच्या संलग्न देशांच्या फलंदाजांनी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता हाँग काँगच्या निझाकत खानच्या नावावर. निझाकतने केनियाच्या मॉरिस ओडुम्बेच्या नावावर असलेला २० वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे.

१७४ – भारताविरुद्ध आयसीसीच्या संलग्न देशांच्या फलंदाजांनी केलेल्या सर्वाधिक भागीदारीचा विक्रमही हाँग काँगच्या फलंदाजांच्या नावावर जमा. अंशुमन रथ आणि निझाकत खान यांनी भारताविरुद्ध १७४ धावांची भागीदारी केली. याआधी केनियाच्या के. ओटीनियो आणि आर. शहा या फलंदाजांनी भारताविरुद्ध १२१ धावांची भागीदारी केली होती.

१३२ – दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान हे भारतीय संघासाठी वन-डे सामना खेळण्याचं १३२ वं वेगळं ठिकाण ठरलं.

२०१२ – हाँग काँगविरुद्ध सामन्याआधी २०१२ साली आशिया चषकात पाकिस्तानी सलामीवीरांनी शतकी भागीदारी करुनही भारतीय संघ सामना जिंकला होता. मीरपूर येथे हा सामना रंगला होता, यानंतर तब्बल ६ वर्षांनी भारताला अशी किमया साधता आलेली आहे.