Asia Cup 2018 Timetable : आशिया चषक २०१८ चे वेळापत्रक आज आयसीसीकडून जाहीर करण्यात आले. या स्पर्धेत एकूण ६ संघ खेळणार असून अ गटात भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना स्थान मिळाले आहे. १५ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती येथे ही स्पर्धा रंगणार आहे. तर २८ सप्टेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना दुबई येथे खेळला जाणार आहे.

पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भारतीय संघ पुन्हा एकदा दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताचा १९ तारखेला पाकिस्तानशी सामना होणार असून २०१७च्या चॅम्पियन्स करंडकातील अंतिम फेरीच्या लढतीनंतर प्रथमच हे दोन संघ एकमेकांसमोर येणार आहेत. त्यामुळे, साहजिकच क्रीडारसिकांमध्ये आतापासूनच या सामन्याविषयी चर्चा रंगली आहे.

भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका व अफगाणिस्तान या देशांना आशिया चषकासाठी थेट मुख्य फेरीत प्रवेश मिळाला असून संयुक्त अरब अमिराती (यूएई), सिंगापूर, ओमान, नेपाळ, मलेशिया व हाँगकाँग या देशांमध्ये मुख्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी चुरस रंगणार आहे.

भारताचा पाकिस्तानसह ‘अ’ गटात समावेश करण्यात आला असून ‘ब’ गटात श्रीलंका, बांगलादेश व अफगाणिस्तान या संघांना समाविष्ट करण्यात आले आहे. अ गटात अद्याप आणखी एक संघ समाविष्ट करण्यात येणार आहे.  १५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचा पहिला सामना बांगलादेश व श्रीलंका यांच्यात खेळला जाणार आहे.

वेळापत्रक

साखळी फेरी

१५ सप्टेंबर – बांगलादेश वि. श्रीलंका

१६ सप्टेंबर – पाकिस्तान वि. पात्रता संघ

१७ सप्टेंबर – श्रीलंका वि. अफगाणिस्तान

१८ सप्टेंबर – भारत वि. पात्रता संघ

१९ सप्टेंबर – भारत वि. पाकिस्तान

२० सप्टेंबर – बांगलादेश वि. अफगाणिस्तान

सर्वोत्तम चार फेरी – २१ ते २६ सप्टेंबर

अंतिम फेरी – २८ सप्टेंबर