X

Asia Cup 2018 : भारत-पाक सामन्यात चहलचं अर्धशतक, जाणून घ्या हा अनोखा विक्रम

सामन्यात लेगस्पिनर युझवेन्द्र चहल याने २ बळी घेतले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यातदेखील भारताने पाकिस्तानला धूळ चारली. सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार रोहित शर्माने झळकावलेल्या शतकांच्या जोरावर भारताने पाकिस्तानवर दुबईच्या मैदानात Super 4 गटात ९ गडी राखून मात केली आणि अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. पाकिस्तानने विजयासाठी दिलेले २३८ धावांचे आव्हान भारताने रोहित आणि शिखरच्या भागीदारीच्या जोरावर सहज पूर्ण केले.

या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा केल्यामुळे पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सामन्यात लेगस्पिनर युझवेन्द्र चहल याने २ बळी घेतले. या दोन बळींच्या जोरावर त्याने एक नवा विक्रम प्रस्थापित केला. त्याने या सामन्यात बळींचे अर्धशतक पूर्ण केले. यासह एकदिवसीय कारकिर्दीत सर्वात जलद ५० बळी बाद करणारा तो पहिला भारतीय लेगस्पिनर ठरला. बळींचे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याला ३० सामने खेळावे लागले. चहलने आसिफ अलीला त्रिफळाचीत करत आपला पन्नासावा बळी टिपला. या सामन्यात भारताला पहिला बळीदेखील त्यानेच मिळवून दिला. पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हक याला त्याने पायचीत केले होते.

दरम्यान, सामना संपल्यानंतर चहलने पत्रकारांशी संवाद साधला. ‘पाकिस्तानला सलग दोन सामन्यांत पराभूत करणे हे आनंददायक आहे. यामुळे अंतिम फेरीत खेळण्यासाठी आमच्या संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. आम्ही स्टेडियम मध्ये आलो तेव्हा प्रेक्षकांचा खूप पाठिंबा मिळाला आणि त्यामुळे मैदानावर खेळताना तणाव जाणवला नाही, असे त्याने सांगितले.दरम्यान, या सामन्यात चहलसह जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनीही दोन-दोन बळी बाद केले.

  • Tags: Yuzvendra Chahal, आशिया कप - 2018,