News Flash

Asia Cup Hockey – आशिया चषक हॉकीत भारत विजेता, अंतिम सामन्यात मलेशियाचा पराभव

अंतिम सामन्यात रमणदीप, ललित उपाध्यायचे गोल

सामन्यात पहिला गोल झळकावल्यानंतर आनंद व्यक्त करताना रमणदीप सिंह

आशिया खंडातील हॉकीवर भारताने आपलं वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित करत आशिया चषक आपल्या नावे केला आहे. अंतिम सामन्यात मलेशियाच्या संघावर २-१ अशी मात करत भारताने आशिया चषकावर आपलं नाव कोरलं आहे. बांगलादेशमधील ढाका येथे हा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यावर अखेरच्या मिनीटात मलेशियाची झुंज मोडीत काढत भारताने विजेतेपद आपल्या नावे कायम केलं. आशिया चषकातलं भारताचं हे तिसरं विजेतेपद ठरलं. साखळी फेरीतले सर्व सामने आणि सर्वोत्तम ४ गटात अपराजित राहण्याचा विक्रम केल्यानंतर भारतीय संघ मलेशियावर मात करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला होता. सामन्याच्या पहिल्या मिनीटापासून भारताने आपल्या खेळात आक्रमकता ठेवली होती. भारताच्या आघाडीच्या फळीतल्या ताळमेळाचं उत्तम उदाहरण अवघ्या तिसऱ्या मिनीटाला दिसून आलं. एस. व्ही. सुनील आणि रमणदीप सिंह यांनी रचलेल्या सुरेख चालीचं रुपांतर गोलमध्ये झालं. तिसऱ्या मिनीटाला मिळालेल्या या आघाडीमुळे भारताचा संघ सामन्यात वरचढ झालेला पहायला मिळाला. यानंतर पहिल्या सत्रात भारताने मलेशियाला सामन्यात वरचढ होण्याची संधी दिली नाही.

दुसऱ्या सत्रात मलेशियाने आपल्या खेळात सुधारणा केली. आक्रमक चाली रचत मलेशियाच्या आघाडीच्या खेळाडूंनी भारतीय बचावफळीवर आक्रमणं केली. मात्र भारताचा बचाव मोडणं त्यांना जमलं नाही. गोल करण्याच्या काही सुरेख संधी मलेशियाच्या खेळाडूंनी घाई करत वाया घालवल्या. भारतालाही दुसऱ्या सत्रात पेनल्टी कॉर्नवर गोल करण्याची संधी चालून आली होती, मात्र मलेशियाच्या गोलकिपरने उत्तम बचाव करत भारताच्या मनसुब्यांवर पाणी फिरवलं. मात्र दुसरं सत्र संपत असताना भारताच्या आघाडीच्या फळीतील गुरजंत सिंहने दिलेल्या पासवर २९ व्या मिनीटाला ललित उपाध्यायने बॉलला गोलपोस्टची दिशा दाखवत भारताची आघाडी २-० ने वाढवली.

मध्यांतरानंतर भारतातीय संघाने घेतलेली आघाडी अधिक भक्कम होणार असा अंदाज सर्वांनी बांधला होता. याचप्रमाणे खेळ करत भारताने तिसऱ्या सत्रात मलेशियाच्या २३ यार्ड सर्कल एरियात प्रवेश करत गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी भारताचे प्रयत्न फोल ठरले. भारतीय खेळाडूंनी रचलेल्या चाली योग्य वेळी साथ न आल्यामुळे वाया गेल्या. याचसोबत रमणदीप आणि आकाशदीपने काही क्षुल्लक चुका करत सामन्यात आघाडी घेण्याची संधी वाया घालवली.

मलेशियाच्या संघाने याआधी सुलतान अझलन शहा कप हॉकी आणि वर्ल्ड हॉकीलीग सेमीफायनल स्पर्धेत भारतावर मात केली आहे. त्यामुळे या अंतिम सामन्यात मलेशियाचा संघ सहजासहजी हार पत्करणार नाही असा सर्वांनी अंदाज बांधला होता. याच उद्देशाने मलेशियाने अखेरच्या सत्रात आक्रमक खेळाला सुरुवात करुन भारतावर दडपण निर्माण करण्यास सुरुवात केली. या आक्रमक खेळाचा फायदा घेत ५० व्या मिनीटाला शरील साबाहने मलेशियाचा पहिला गोल करत भारताची आघाडी २-१ अशी कमी केली. मलेशियाकडून झालेल्या या आक्रमणामुळे भारतीय संघ अखेरच्या मिनीटांमध्ये बॅकफूटला ढकलला गेला. चौथ्या सत्रात भारतीय बचावपटूंनी क्षुल्लक चुका करत बॉलवरचा ताबा गमावण्यास सुरुवात केली. सामन्यात शेवटची ३ मिनीटं शिल्लक असताना मलेशियाच्या संघाला पेनल्टी कॉर्नवर गोल करण्याची आणखी एक संधी चालून आली होती. मात्र भारतीय संघाचा गोलकिपर आकाश चिकटेने मलेशियाचा सामन्यात बरोबरी साधण्याचा हा प्रयत्न हाणून पाडला. यानंतर सामन्यातील शेवटची दीड मिनीटं सर्वोत्तम बचाव करत भारताने अंतिम सामन्यात विजय नक्की केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2017 6:52 pm

Web Title: asia cup hockey 2017 bangladesh india beat malasya and retains asia cup also bags gold medal
टॅग : Bangladesh
Next Stories
1 अशा पद्धतीने रंगतील प्रो-कबड्डीच्या प्ले-ऑफचे सामने; ‘या’ संघाला थेट अंतिम सामन्यात प्रवेश
2 ऑस्ट्रेलियाच्या मायकल हसीची प्रो-कबड्डीच्या मैदानात चढाई
3 मुंबईचा सामना भारताने गमावला, ६ गडी राखून न्यूझीलंडचा विजय; मालिकेत १-० ने आघाडी
Just Now!
X