अनुभवाचे बोल फार महत्त्वाचे असतात. फिरकीवर प्रभुत्व असल्याचा टेंभा मिरवणारे भारत आणि श्रीलंकेचेही फलंदाज फिरकीपटूंच्या तालावर हाराकिरी पत्करत असताना एकीकडे जिथे शिखर धवनला भारताला मोठी धावसंख्या उभारून देता आली नाही, तिथे श्रीलंकेच्या अनुभवी कुमार संगकाराने एकाकी झुंज देत संघाला विजय मिळवून देण्याची किमया साधली. श्रीलंकेने झटपट फलंदाज गमावल्याने सामना अटीतटीचा झाला. पण संगकाराने शतक साकारल्याने श्रीलंकेला भारताला दोन विकेट्स राखून पराभूत करता आले. धवनच्या ९४ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने २६४ धावांची मजल मारली होती. या विजयासह श्रीलंकेचे ८ गुण झाले असून त्यांनी अंतिम फेरीच्या दिशेने कूच केली आहे. भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशला पराभूत केले असले तरी पहिल्या कठीण परीक्षेमध्ये कोहलीच्या युवा सेनेवर अनुत्तीर्ण होण्याची पाळी
आली.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला ८० धावांची दमदार सलामी मिळाली. पण त्यानंतर लाहिरू थिरीमानेला (३८) आणि अर्धशतकवीर कुशल परेरा (६४) हे दोन्ही फलंदाज आव्हानाच्या अध्र्यातच गमवावे लागले. त्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजांनी तंबूत परतायची घाई दाखवली आणि त्यांचा संघ पराभवाच्या जाळ्यात ओढला जात होता. पण हे सारे नाटय़ शांतपणे पाहत खेळपट्टीवर ठाण मांडलेल्या संगकाराने हार न मानता एकाकी झुंज देत श्रीलंकेचा ‘विजयपथ’ बनवला. कसलेही दडपण न घेता संगकाराने ८४ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १०३ धावांची अफलातून खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला. संघाला विजयासाठी सात धावा हव्या असताना त्याला शमीने बाद केले, पण तोपर्यंत त्याने संघाच्या विजय निश्चित केला होता. दोन्ही संघांतील फिरकीपटूंनी या सामन्यात मोलाची भूमिका बजावली. श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी आठ फलंदाजांना बाद केले, तर भारताच्या फिरकीपटूंनी पाच बळी मिळवले.
तत्पूर्वी, श्रीलंकेने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीला पाचारण केले आणि त्यांना मोठय़ा धावसंख्येपासून रोखले. रोहित शर्माला (१३) सेनानायकेने पायचीत करत संघाला पहिले यश मिळवून दिले, पण त्यानंतर धवन आणि विराट कोहली (४८) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी रचत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. पण अजंथा मेंडिसने कोहलीचा अप्रतिमपणे त्रिफळा भेदला आणि भारताच्या डावाला जबर धक्का बसला. कोहली बाद झाल्यावर गरज नसताना मोठे फटके मारण्याच्या नादात भारतीय फलंदाजांनी आत्मघात केला आणि भारताला २६४ धावांवर समाधान मानावे लागले. धवनने दमदार फलंदाजी करत ७ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ९४ धावांची खेळी साकारली, पण त्याचे शतक यावेळी फक्त सहा धावांनी हुकले. मेंडिसनेच त्याला त्रिफळाचीत केले. मेंडिसने चार विकेट्स घेत भारताचे कंबरडे मोडले, तर सेनानायकेने तीन बळी मिळवत त्याला चांगली साथ दिली.

धावफलक
भारत : रोहित शर्मा पायचीत गो. सेनानायके १३, शिखर धवन त्रिफळा गो. मेंडिस ९४, विराट कोहली त्रि.गो. मेंडिस ४८, अजिंक्य रहाणे झे. थिरीमाने गो. सेनानायके २२, अंबाती रायुडू झे. परेरा गो. डी‘सिल्व्हा १८, दिनेश कार्तिक झे. डी‘सिल्व्हा गो. मेंडिस ४, रवींद्र जडेजा नाबाद २२, स्टुअर्ट बिन्नी पायचीत गो. सेनानायके ०, आर. अश्विन त्रि.गो. मलिंगा १८, भुवनेश्वर कुमार यष्टीचित संगकारा गो, मेंडिस ०, मोहम्मद शमी नाबाद १४, अवांतर (बाइज ४, लेग बाइज १, वाइड ६) ११, एकूण ५० षटकांत ९ बाद २६४.
बाद क्रम : १-३३, २-१३०, ३-१७५, ४-१९६, ५-२००, ६-२४१, ७-२१५, ८-२४५, ९-२४७.
गोलंदाजी : लसिथ मलिंगा १०-०-५८-१, अँजेलो मॅथ्यूज ३.२-१-९-०, सचित्रा सेनानायके १०-०-४१-३, थिसारा परेरा ६.४-०-४०-०, अजंथा मेंडिस १०-०-६०-४, चतुरंगा डी‘सिल्व्हा १०-०-५१-०.
श्रीलंका : कुशल परेरा झे. कार्तिक गो. अश्विन ६४, लहिरू थिरीमाने पायचीत गो. अश्विन ३८, कुमार संगकारा झे. अश्विन गो. शमी १०३, महेला जयवर्धने झे. रोहित गो. जडेजा ९, दिनेश चंडिमल त्रि. गो. जडेजा ०, अँजेलो मॅथ्यूज पायचीत गो. शमी ६. सचित्रा सेनानायके झे. रोहित गो. शमी १२, चतुरंगा डी‘सिल्व्हा पायचीत गो. जडेजा ९, थिसारा परेरा नाबाद ११, अजंथा मेंडिस नाबाद ५, अवांतर (लेग बाइज ७, वाइड १) ८, एकूण ४९.२ षटकांत ८ बाद २६५.
बाद क्रम : १-८०-२-१३४, ३-१४८, ४-१४८, ५-१६५, ६-१८३, ७-२१६, ८-२५८.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ९.२-१-४५-०, मोहम्मद शमी १०-०-८१-३, आर. अश्विन १०-०-४२-२, स्टुअर्ट बिन्नी ४-०-२२-०, रवींद्र जडेजा १०-१-३०-३, अंबाती रायुडू १-०-९-०, रोहित शर्मा ५-०-२९-०.
सामनावीर : कुमार संगकारा.
गुण – श्रीलंका : ४, भारत : ०.