दुबईत झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशवर मात करत आशिया चषकाचं विजेतेपद पटकावलं आहे. बांगलादेशने दिलेलं २२३ धावांचं आव्हान भारताने अटीतटीच्या लढतीत शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं. ३ गडी राखून बांगलादेशवर मात करत भारत सातव्यांदा आशिया चषकाचा मानकरी ठरला आहे. महेंद्रसिंह धोनी माघारी परतल्यानंतर संकटात सापडलेल्या भारतीय संघाला जाडेजा-भुवनेश्वरने भागीदारी रचून विजयाच्या वाटेवरण आणलं. ही जोडी माघारी परतल्यानंतर केदार जाधव-कुलदीप यादव जोडीने अखेरच्या षटकांमध्ये भारताला विजय मिळवून दिला.

सामना संपल्यानंतर झालेल्या सत्कार सोहळ्यात कर्णधार रोहित शर्माने या विजयाचं श्रेय संपूर्ण भारतीय संघाला दिलं. “संपूर्ण मालिकेत आम्ही सर्वोत्तम खेळ केला आहे, त्यामुळे हे विजेतेपद आम्ही केलेल्या मेहनतीला मिळालेलं फळ आहे. याआधीही अशा अटीतटीच्या सामन्यांचा अनुभव मी घेतला आहे, मात्र ज्या पद्धतीने अखेरच्या षटकात फलंदाजांनी दबावाचा सामना करत संघाला विजय मिळवून दिला ही गोष्ट वाखणण्याजोगी आहे. अखेरच्या १० षटकांमध्ये आमच्यावर दबाव टाकण्यात बांगलादेशचा संघही यशस्वी झाला, त्यामुळे ते देखील कौतुकास पात्र आहेत”, अशा शब्दांत रोहितने आपल्या संघाचं कौतुक केलं.

अवश्य वाचा – भारताकडून बांगलादेशी वाघांची शिकार, आशिया चषकावर भारताची ‘सत्ता’!

दुसरीकडे बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मोर्ताझानेही आपल्या खेळाडूंचं कौतुक केलं. “मैदानात आम्ही आज अनेक चुका केल्या, तरीही अखेरच्या चेंडूपर्यंत सामना खेचण्यात आम्ही यशस्वी झालो याचा मला अभिमान आहे. विशेषकरुन अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजांनी केलेली कामगिरी ही वाखणण्याजोगीच आहे. मात्र भारताचा संघ या मालिकेत सर्वोत्तम खेळी करत आला असल्यामुळे त्यांनी या सामन्यात विजय मिळवला आहे.” अंतिम सामन्यात केलेल्या शतकासाठी बांगलादेशच्या लिटन दासला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं.

अवश्य वाचा – Asia Cup 2018 : …..आम्ही त्यावेळीच स्पर्धा जिंकली होती – मश्रफी मोर्ताझा