News Flash

आयपीएलच्या मार्गावर पाकिस्तानचा खोडा, PCB चे सीईओ म्हणतात आशिया चषक होणारच…

श्रीलंका किंवा UAE मध्ये स्पर्धेचं आयोजन करण्याची पाक क्रिकेट बोर्डाची तयारी

जगभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ कोणताही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवण्यात आलेला नाही. बीसीसीआयनेही आयपीएलचा तेरावा हंगाम अनिश्चीत काळासाठी पुढे ढकलला आहे. मात्र स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान सहन करावं लागणार आहे. यासाठी बीसीसीआय सप्टेंबर महिन्यात आयपीएलचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. यासाठी ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या प्रस्तावित टी-२० विश्वचषकाबद्दल आयसीसी काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. लॉकडाउन काळात कमी कालावधीत विश्वचषकासारखी स्पर्धा आयोजित करणं सोपं नसल्याचं मत अनेक अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. मात्र दुसरीकडे आशिया चषकाचं यजमानपद मिळालेल्या पाकिस्तानने कोणत्याही परिस्थितीत आशिया चषकाचं आयोजन होणारच असा पवित्रा घेतला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे टी-२० विश्वचषक किंवा आशिया चषक स्पर्धा आपल्या ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे झाल्यास बीसीसीआयला यंदाचा हंगाम रद्द करावा लागू शकतो.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ वासिम खान यांनी यंदाचा आशिया चषक ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच होईल असं स्पष्ट केलं आहे. “आशिया चषकाचं आयोजन ठरल्याप्रमाणेच होईल. पाकिस्तानी संघ इंग्लंड दौऱ्यावरुन २ सप्टेंबर रोजी परतणार आहे. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीत आशिया चषकाचं आयोजन केलं जाईल. पाकिस्तानात सध्या करोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यासाठी UAE किंवा श्रीलंकेत या स्पर्धेचं आयोजन केलं जाऊ शकतं.” खान एका पाकिस्तानी यू-ट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. २०२० आशिया चषकाचं यजमानपद पाकिस्तानकडे आलं आहे. मात्र भारताने पाकिस्तानात स्पर्धा होणार असल्याच भारत त्यात सहभागी होणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी ही स्पर्धा त्रयस्थ ठिकाणी भरवण्याच्या पर्यायायवर विचार सुरु होता.

श्रीलंका आणि UAE या दोन्ही देशांतील अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु असल्याचं खान यांनी यावेळी बोलताना सांगितलं. श्रीलंकेला आयोजन करण्यास अडचण येत असल्यास UAE मध्ये या स्पर्धेचं आयोजन होईल. दोन्ही देशांमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या कमी असल्याचंही खान म्हणाले. बीसीसीआयही सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. याबद्दल बोलताना, आयपीएलचं आयोजन कधी होतंय याविषयी मला माहिती नाही. त्याविषयी माहिती मिळताच चर्चा केली जाईल, पण आमच्यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आशिया चषकाचं आयोजन करण्याचा पर्याय खुला असल्याचं खान यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये आयसीसी काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 4:19 pm

Web Title: asia cup will take place in either sri lanka or uae says pcb ceo wasim khan psd 91
Next Stories
1 टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूने केला सरावाचा ‘श्रीगणेशा’
2 सचिनची सावली बनलेल्या बलवीर चंदला लॉकडाउनचा फटका, करोनाची लागण झाल्यामुळे दुहेरी संकट
3 सावळागोंधळ : मोहम्मद हाफिजची दुसरी करोना चाचणी निगेटीव्ह
Just Now!
X