महेंद्रसिंग धोनी हा जखमी झाल्यामुळे मला ऐनवेळी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. या संधीचा उपयोग संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी मी करणार आहे, असे यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने सांगितले. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पहिला सामना बुधवारी बांगलादेशबरोबर होणार आहे. कर्णधार धोनी हा दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी संघाचे नेतृत्व विराट कोहली करीत असून यष्टिरक्षक म्हणून कार्तिकचा समावेश झाला आहे.
‘‘न्यूझीलंडविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या मालिकेत भारताला दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. हा आता भूतकाळ आहे. आम्ही आता येथील स्पर्धेवर लक्ष केंद्रित करीत आहोत. संघात निवड झाल्याचे मला तीन दिवसांपूर्वी समजले. माझ्यासाठी तो सुखद धक्का होता तरीही भारतासाठी खेळण्याची संधी पुन्हा मिळाल्यामुळे मला खूप अभिमान वाटतो आहे. अर्थात माझ्यासाठी ही मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी मी उत्सुक झालो आहे. आमचा संघ अतिशय समतोल आहे. अव्वल दर्जाच्या खेळाडूंबरोबर खेळण्याचा अनुभव मला मिळणार आहे,’’ असे कार्तिकने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘‘बांगलादेश संघाला आम्ही कमी मानत नाही. अनपेक्षित विजय नोंदविण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. बराच काळ भारताला विजयाची चव चाखावयास मिळाली नसली, तरी येथे आम्ही विजयी होण्यासाठीच आलो आहोत. गेल्या आठ सामन्यांमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला होता, त्या संघात माझा समावेश नव्हता. त्यामुळे पराभवाची कारणे मी स्पष्ट करू शकणार नाही.’’