कर्णधार हरमनप्रीत कौरच्या आक्रमक खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने, आशिया चषक टी-२० स्पर्धेत आपला दुसरा विजय मिळवला आहे. भारतीय महिलांनी थायलंडवर ६६ धावांनी मात केली. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या भारतीय महिलांनी २० षटकात १३२ धावांपर्यंत मजल मारली. यानंतर आपल्या भेदक माऱ्याच्या जोऱ्यावर भारतीय महिला गोलंदाजांनी थायलंडला ६६ धावांवर रोखत स्पर्धेतल्या आपल्या दुसऱ्या मोठ्या विजयाची नोंद केली. पहिल्या सामन्यात भारतीय महिलांनी मलेशियाला १४२ धावांनी हरवलं होतं.

भारताकडून मोना मेश्रामने ३२ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. मात्र कर्णधार हरमनप्रीत कौरने १७ चेंडूंमध्ये नाबाद २७ धावांची आक्रमक खेळी करत भारताला आव्हानात्मक धावांचा टप्पा गाठून दिला. हरमनप्रीत कौरसोबत स्मृती मंधानानेही फटकेबाजी करत भारताच्या धावसंख्येत भर घातली. फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही हरमनप्रीत कौरने आपली चमक दाखवली. ११ धावांमध्ये ३ बळी घेत हरमनप्रीतने थायलंडच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. या खेळीच्या आधारावर हरमनप्रीतला सामनावीराच्या किताबाने गौरवण्यात आलं.

याव्यतिरीक्त भारताकडून दिप्ती शर्माने २ विकेट घेत हरमनप्रीत कौरला चांगली साथ दिली. थायलंडकडून नताया बुचॅथमने २१ चेंडूत ४० धावांची खेळी केली. मात्र तिला इतर फलंदाजांची हवीतशी साथ मिळू शकली नाही. या स्पर्धेत भारतीय महिलांचा पुढचा सामना बांगलादेशशी होणार आहे.

संक्षिप्त धावफलक – भारत १३२/४ (मोना मेश्राम ३२, हरमनप्रीत कौर नाबाद २७ वोंगपाका लिएंगप्रास्रेट २/१६), थायलंड ६६/८ (नताया बुचॅथम २१, हरमनप्रीत कौर ३/११, दिप्ती शर्मा २/१६)