अनंत चोपडेचे आव्हान संपुष्टात

ऑलिम्पिक चाचणी बॉक्सिंग स्पर्धा : – चार वेळा आशियाई पदकविजेत्या शिवा थापाने ऑलिम्पिक चाचणी बॉक्सिंग स्पर्धेच्या ६३ किलो वजनी गटात मंगळवारी उपांत्यपूर्व लढत जिंकून पदकाची निश्चिती केली. याशिवाय अन्य सहा खेळाडूंनी रिंगणात पाऊलही न ठेवता उपांत्य फेरी गाठली आहे.

महिन्याच्या पूर्वार्धात तिसरे राष्ट्रीय विजेतेपद जिंकणाऱ्या आसामच्या शिवाने जपानच्या युकी हिराकावाला ५-० असे नमवले आणि उपांत्य फेरी गाठली. बुधवारी उपांत्य सामन्यात त्याची डायसुके नॅरिमॅत्सूशी गाठ पडणार आहे. डायसुकेला सलामीच्या सामन्यात पुढे चाल मिळाली.

माजी कनिष्ठ विश्वविजेती निखात झरिन (५१ किलो), आशियाई रौप्यपदक विजेता सुमित सांगवान (९१ किलो), आशिष (६९ किलो), व्हॅन्हलिमपुया (७५ किलो), सिम्रजनजीत कौर (६० किलो) आणि पूजा राणी (७५ किलो) यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. अनंत चोपडेचे आव्हान मात्र उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. जपानच्या तोशो काशीवासाकीने रंगतदार सामन्यात त्याचा ३-२ असा पराभव केला.

राष्ट्रीय विजेत्या सुमितची कझाकस्तानच्या एयबीक ओरलबेशी गाठ पडणार आहे. काही दिवसांपूर्वी सहा वेळा विश्वविजेत्या एम. सी. मेरी कोमशी लढतीची मागणी करणाऱ्या निखातचा सामना जपानच्या साना कावानोशी होणार आहे. आशियाई क्रीडा स्पध्रेतील कांस्यपदक विजेत्या राणीची लढत ब्राझीलच्या बेट्रिझ सोआरीसशी होणार आहे. वर्षांच्या पूर्वार्धात झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पध्रेत राणीने रौप्यपदकाची कमाई केली होती.