भारताने २०१९ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संयोजनाचा अद्याप कोणताही विचार केलेला नाही, असे भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे (आयओए) अध्यक्ष एन.रामचंद्रन यांनी येथे सांगितले.
व्हिएतनामने या स्पर्धेच्या संयोजनातून माघार घेतली असल्यामुळे भारताने या स्पर्धेचे आयोजन आपणास मिळावे अशी विनंती केली असल्याचे आयओएचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी नुकतेच एका वृत्तसंस्थेस दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. मात्र, या वृत्ताचा इन्कार करीत रामचंद्रन म्हणाले, अशा कोणताही विषयावर चर्चा झालेली नाही. कोणत्याही मोठय़ा स्पर्धा आयोजित करण्याऐवजी आमची संस्था आर्थिकदृष्टय़ा अधिक सक्षम करण्यावर माझा भर राहणार आहे. अनेक कापरेरेट संस्था खेळासाठी आर्थिक सहकार्य करण्यासाठी उत्सुक आहेत. शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता आमची संस्था आर्थिक स्वायत्त करण्याचे माझे ध्येय आहे.  
आमच्या संस्थेकडे जो निधी येईल, त्याचे वितरण आमच्या संस्थेस संलग्न असलेल्या विविध खेळांच्या राष्ट्रीय संघटनांमध्ये केले जाईल असे सांगून रामचंद्रन म्हणाले, मी केवळ एकदाच अध्यक्षपदी राहणार आहे. त्यामुळे संस्थेचा कारभार पारदर्शी कसा राहील यावर माझा भर राहील. विविध खेळांच्या संघटनांचा कारभारही पारदर्शी करण्याबाबत मी आग्रही राहणार आहे. आपण समाजाचे ऋण फेडत आहोत याची जाणीव प्रत्येक संघटनेला असली पाहिजे. आपल्या संस्थांना जो निधी मिळत असतो, त्याचे उत्तरदायित्व आपल्यावर आहे हे या संघटनांनी ओळखून त्यानुसार आचरण ठेवले पाहिजे.
खेळाडूंचा विकास, कारभारात पारदर्शकता व खर्चाबाबत उत्तरदायित्व हीच संघटनेची त्रिसूत्री असली पाहिजे. या सूत्रीपासून आपण दूर जाऊ शकत नाही. आपण क्रीडा क्षेत्रात अन्य देशांपेक्षा पन्नास वर्षे पिछाडीवर आहोत.
आपल्या खेळाडूंनी ऑलिम्पिक व आशियाई क्रीडा स्पर्धेत जी पदके मिळविली आहेत, त्याचे सर्वस्वी श्रेय या खेळाडूंनी केलेल्या कठोर परिश्रमास जाते. संघटनांचा त्यामध्ये फारसा हातभार नाही असे माझे स्पष्ट मत आहे, असेही रामचंद्रन म्हणाले.