07 March 2021

News Flash

पूजा घाटकरचा सुवर्णवेध!

पुण्याच्या पूजा घाटकरने कुवैतमध्ये सुरू असलेल्या सातव्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णवेध घेतला.

| March 10, 2014 05:03 am

पुण्याच्या पूजा घाटकरने कुवैतमध्ये सुरू असलेल्या सातव्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णवेध घेतला. तिने हे यश मिळविताना लंडन ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या यूई सिलिंग (चीन) हिला पराभूत केले. या कामगिरीबरोबरच पूजाने पहिल्या दिवशी सांघिक कांस्यपदकाचीही कमाई केली.
पूजाने पात्रता फेरीत ४० नेममध्ये ४१३.१ गुण नोंदविले व सातव्या क्रमांकासह अंतिम फेरीत स्थान मिळविले. अंतिम फेरीतील आठ स्पर्धकांमध्ये पूजापुढे सिलिंग हिच्यासह मोठे आव्हान होते. तिने कोणतेही दडपण न घेता २०८.८ गुण नोंदवित सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत यंदा भारताला मिळालेले हे पहिलेच सुवर्णपदक आहे. चीनच्या डी. यू. बेज हिने २०७.२ गुणांसह रौप्यपदक पटकावले. सिलिंग हिला १८६.२ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
सांघिक प्रकारात घाटकर, अपूर्वी चंडेला आणि अयोनिका पॉल यांच्या भारतीय संघाने कांस्यपदक मिळवले. भारताने चार प्रयत्नांत ३०७.७, ३१०.४, ३१०.७, ३०६.८ असे मिळून १२३५.६ गुण मिळवले. घाटकर हिने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदक जिंकले होते.
पुरुषांच्या एअर पिस्तूल प्रकारात समरेश जंग आणि पी. एन. प्रकाश यांनी अंतिम फेरीत मजल मारली. मात्र त्यांना अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. जंगने ५७६ गण मिळवल्यानंतर अंतिम फेरीत ११९.४ गुण प्राप्त करता आले. प्रकाशने ५८१ गुणांनंतर अंतिम फेरीत फक्त ९८.२ गुण मिळवले. प्रकाश (५८१ गुण), जंग (५७६) आणि राय (५७५) यांच्या भारतीय संघाने १८०० पैकी १७३२ गुण मिळवत सांघिक रौप्यपदक पटकावले. महिलांच्या एअर पिस्तूल प्रकारात, हिना सिद्धू, हरवीन स्राव आणि श्वेता चौधरी या सोमवारी आपले नशीब अजमावणार आहेत.
स्वप्नवत सोनेरी यश -पूजा
‘‘या स्पर्धेत पदक मिळविण्यासाठी मी कसून सराव केला होता. मात्र विजेतेपदाची खात्री नव्हती. माझ्यासाठी हे स्वप्नवत सोनेरी यश आहे. सोनेरी कामगिरीमुळे माझा आत्मविश्वास उंचावला आहे. आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा व आशियाई क्रीडा स्पर्धासाठी मला हे सुवर्णपदक प्रेरणादायी ठरेल,’’ असे पूजा घाटकरने सांगितले.
भारतीय रायफल नेमबाजी संघटना व ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट यांना या पदकाचे श्रेय देत पूजा म्हणाली, ‘‘या खेळासाठी मला या दोन्ही संस्थांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. माझ्या रायफलपासून फिजिओथेरपीपर्यंत सर्व खर्चाची बाजू ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टने उचलली आहे. तसेच मला सरावासाठीही त्यांचे सहकार्य लाभले आहे. त्यामुळेच मी हे यश पाहू शकले आहे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2014 5:03 am

Web Title: asian air gun championship pooja ghatkar clinches gold
Next Stories
1 भारत पेट्रोलियम, एअर इंडिया अंतिम फेरीत
2 ‘तरुण संघटकांकडे खेळाची सूत्रे द्यावीत’
3 बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर आता ट्रकचा थरार रंगणार!
Just Now!
X