महिलांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अनपेक्षित कामगिरी; गोळाफेकपटू ताजिंदर सिंगला सुवर्ण

भारताची अ‍ॅथलीट गोमती मरिमुथू हिने अनपेक्षित कामगिरी करत महिलांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सोनेरी यश संपादन केले. आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताने सोमवारी पाच पदकांची भर घातली. गोळाफेकपटू ताजिंदरसिंग तूर यानेही सुवर्णपदकाची कमाई करत सर्वाचे लक्ष वेधून घेतले.

३० वर्षीय गोमतीने आपली सर्वोत्तम वेळ नोंदवत २ मिनिटे ०२.७० सेकंद अशा कामगिरीसह सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. राष्ट्रीय विक्रमवीर ताजिंदरने खलिफा स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम फेरीत पहिल्याच प्रयत्नांत २०.२२ मीटर गोळाफेक करत सुवर्णपदकावर कब्जा केला. २४ वर्षीय ताजिंदरने २०.७५ अशी सर्वोत्तम कामगिरी केली असून स्पर्धेला सुरुवात होण्याआधी तोच सुवर्णपदकाचा दावेदार मानला जात होता. त्यानेही आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत चाहत्यांची मनेजिंकली.

शिवपाल सिंग याने पुरुषांच्या भालाफेक प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. शिवपालने ८६.२३ मीटर अशी कामगिरी करत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये याच मैदानावर होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले. जबीर मदारी पल्लियाली आणि सरिताबेन गायकवाड यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक पटकावले. सरिताबेन हिने ५७.२२ सेंकद अशी वेळ देत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती. याच गटात व्हिएतनामच्या कुआच थे लान (५६.१० सेकंद) आणि बहारिनच्या अमिनात युसूफ जमाल (५६.३९) यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक प्राप्त केले होते.

पुरुषांच्या ४०० मीटर शर्यतीत गतविजेता मोहम्मद अनास आणि गेल्या वेळचा रौप्यपदक विजेता अरोकिया राजीव यांना पदक मिळवण्यात अपयश आले. राजीवला ४५.३७ सेकंद अशा कामगिरीसह चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. गेल्या वर्षी पायाला झालेल्या दुखापतीमुळे अनासला चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने ४६.१० सेकंदासह आठवा क्रमांक प्राप्त केला.