भारताच्या मिश्र रिले चमूला रौप्यपदक

दोहा : भारताच्या ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले चमूने आशियाई अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे, तर संजीवनी जाधवने १० हजार मीटर शर्यतीमध्ये कांस्यपदक पटकावले आहे.

४ बाय ४०० मीटर मिश्र रिले हा प्रकार अ‍ॅथलेटिक्स स्पर्धात यंदा प्रथमच समाविष्ट करण्यात आला आहे. भारताच्या मोहम्मद अनास, एम. आर. पूवम्मा, व्ही. के. विस्मया आणि अरोकिया रावजी या चमूने ३:१६.४७ मिनिटे वेळ राखून दुसरे स्थान मिळवले. या गटात बहरिनने सुवर्णपदक जिंकले. ४०० मीटर शर्यतीतून पाठीच्या दुखापतीमुळे माघार घेणारी हिमा दास या स्पर्धेत सहभागी होऊ शकली नाही.

नाशिकच्या २२ वर्षीय संजीवनीने ३२ मिनिटे आणि ४४.९६ सेकंद अशी सर्वोत्तम वैयक्तिक वेळ नोंदवताना भारताच्या खात्यावर कांस्यपदक जमा केले. बहरिनची शिताये हॅबटेगेब्रेल (३१:१५.६२ मि.) आणि जपानच्या हितो निया (३१:२२.६३ मि.) यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदकावर नाव कोरले.