दीपक, कविंदर, आशीष आणि सिमरनजीत यांचीदेखील रौप्यपदकांची कमाई

अमित पांघलने (५२ किलो) वर्षांतील सलग दुसरे सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधली, तर पूजा राणीने (८१ किलो) महिलांच्या विजेतेपदाला गवसणी घातल्यामुळे आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पध्रेतील भारताच्या अभियानाची सांगता सुखद झाली.

भारताने दोन सुवर्ण, चार रौप्य आणि सात कांस्य अशा एकूण १३ पदकांची कमाई केली. आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा पुरुष आणि महिलांसाठी प्रथमच एकत्रितपणे आयोजित करण्यात आली होती.

गतवर्षी आशियाई क्रीडा स्पध्रेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या पांघलने कोरियाच्या किम इंकयूवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. फेब्रुवारीत बल्गेरिया येथे झालेल्या स्ट्रँडजा स्मृती बॉक्सिंग स्पध्रेत त्याने सुवर्णपदक मिळवले होते.

२०१२ मध्ये आशियाई बॉक्सिंग स्पध्रेत रौप्यपदक जिंकणाऱ्या २८ वर्षीय पूजाने चीनच्या वांग लिनाला नमवून सुवर्णपदक पटकावले. तिने २०१४च्या आशियाई क्रीडा स्पध्रेत कांस्यपदक मिळवले होते. अंतिम सामन्यात पराभूत झाल्यामुळे राष्ट्रीय विजेता दीपक सिंग (४९ किलो), कविंदर सिंग बिश्त (५६ किलो) आणि आशीष कुमार (७५ किलो) यांना पुरुषांमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर महिलांमध्ये राष्ट्रीय विजेत्या सिमरनजीत कौरने (६४ किलो) रौप्यपदक प्राप्त केले.

४९ किलोऐवजी ५२ किलोमध्ये सहभागी होणाऱ्या पांघलने या वजनी गटातील पहिलेच आंतरराष्ट्रीय पदक जिंकले आहे. अंतिम सामन्यात पांघलने आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. परंतु सावधगिरीने खेळणाऱ्या किम इंकयूकडे त्याचे उत्तर नव्हते.

उझबेकिस्तानच्या नॉदिरजॉन मिर्झाहमेडोव्हकडून पराभूत झाल्यामुळे दीपकला रौप्यपदक मिळाले. या सामन्यात भारतीय संघाला निर्णयाविरोधात दाद मागितल्यामुळे पिवळे कार्ड देण्यात आले. हा नियम यंदा प्रथमच स्पध्रेत प्रायोगिक तत्त्वावर समाविष्ट करण्यात आला आहे. उझबेकिस्तानच्या मिराझिझबेक मिर्झाहोलिलोव्हविरुद्ध बिश्तने पराभव पत्करला. या सामन्यात उत्तराखंडचा बिश्त उजव्या डोळ्याच्या वर पट्टी लावून सहभागी झाला होता. आशीषला कझाकस्तानच्या तुर्सायनबे कुलाखमेटने नमवले. महिलांच्या अंतिम सामन्यात सिमरनजीतने चीनच्या विश्वविजेत्या डोऊ डॅनकडून हार पत्करली, तर दिवसातील अखेरच्या लढतीत राणीने लिनाला पराभूत केले.