आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेतेपद कायम राखण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स चषकाची विजयाने सुरूवात केली आहे. भारतीय हॉकी संघाने यजमान ओमनचा ११-० च्या फरकाने पराभव करत विजयादशमी साजरी केली.

पाचव्या स्थानावरील भारतीय संघासमोर ओमनचा संघ दुबळा जाणवत होता. अखेरपर्यंत ओमनचा संघ बलाढ्य भारतीय संघासमोर संघर्ष करावा लागला मात्र एकही गोल करू शकले नाहीत. भारतीय संघासाठी दिलप्रीत सिंहने सर्वाधिक तीन गोल गेले. दिलप्रीत सिंहने सामन्याच्या ४१व्या, ५५ व्या आणि ५७ व्या मिनीटाला गोल केले. ललित उपाध्याय (१७ मिनीट), हरमनप्रीत (२१ मिनीट), नीलकांता शर्मा (२२ मिनीट), मंदीप सिंह (२९ मिनीट), गुरजंत सिंह (३७ मिनीट), आकाशदीप (४९ मिनीट), वरुण कुमार (४९ मिनीट) आणि चिंग्लेनसाना सिंह (४९ मिनीट) यांनी प्रत्येकी एक-एक गोल केला.

गतविजेत्या भारताने २०१६ मध्ये पाकिस्तानला अंतिम फेरीत ३-२ असे पराभूत करत या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. भारताला जकार्तामध्ये सुवर्णपदकाचा दावेदार मानले जात असताना केवळ कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे निदान या स्पर्धेत तरी भारताकडून दमदार कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे. या स्पर्धेत आशियातील अग्रमानांकित देश म्हणून भारत खेळत आहे.

यानंतर भारतीय संघाचा सामना २० ऑक्टोबर रोजी प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. त्यानंतर भारताला २१ ऑक्टोबरला जपानशी, २३ ऑक्टोबरला मलेशियाशी आणि २४ ऑक्टोबरला दक्षिण कोरियाशी दोन हात करावे लागतील. भारत आणि पाकिस्तानने प्रत्येकी दोन वेळा ही स्पर्धाजिंकली असून तिसऱ्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी भारत सज्ज झाला आहे.