आशियाई अजिंक्यपद  नेमबाजी स्पर्धा :- युवा नेमबाज चिंकी यादवने शुक्रवारी आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी करत भारतासाठी ऑलिम्पिकची ११वी जागा निश्चित केली. चिंकीला पदकाला गवसणी घालता आली नसली तरी तिने आपल्या कारकीर्दीत पात्रता फेरीतील सर्वोत्तम ५८८ गुण मिळवत टोक्यो ऑलिम्पिकसाठी आपले स्थान पक्के केले.

राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेती तसेच जागतिक कनिष्ठ गटात कांस्यपदक पटकावणाऱ्या चिंकीला पात्रता फेरीतील सातत्य अंतिम फेरीत राखता आले नाही. त्यामुळे तिला ११६ गुणांसह सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

मध्य प्रदेश सरकारच्या क्रीडा विभागात इलेक्ट्रिशियन म्हणून काम पाहणाऱ्या मेहताब सिंग यांच्या कन्येने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात पात्रता फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात चमकदार कामगिरी केली. ‘‘माझा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. इतकी मी खूश आहे. ही माझी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. या सर्वाचे श्रेय मी माझे प्रशिक्षक जसपाल राणा यांना देते. त्याचबरोबर भोपाळ अकादमीतील तसेच राष्ट्रीय रायफल असोसिएशनच्या मला सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाची मी आभारी आहे,’’ असे चिंकीने सांगितले.

२१ वर्षीय चिंकीने पात्रता फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात ५८८ गुणांसह दुसरे स्थान पटकावले. थायलंडच्या नाफास्वान यँगपायबून हिने ५९० गुणांसह अव्वल स्थान प्राप्त केले. अंतिम फेरीत प्रवेश करून चिंकीने ऑलिम्पिकचे स्थान निश्चित केले. अंतिम फेरीत मजल मारणाऱ्या चार नेमबाजांनी याआधीच ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवल्याने अन्य चार जणांना आपोआप ऑलिम्पिकची जागा मिळवता आली.

२५ मीटर पिस्तूल प्रकारात भारताने चिंकीच्या रूपाने दुसरे स्थान पटकावले. याआधी राही सरनोबत हिने म्युनिक येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत ऑलिम्पिकची जागा निश्चित केली होती. चिंकीच्या गटात समाविष्ट झालेल्या अन्य भारतीय नेमबाजांनी मात्र निराशा केली. अन्नू राज सिंग (५७५) आणि नीरज कपूर यांना अनुक्रमे २१व्या आणि २७व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. चित्रकलेची आवड जोपासणाऱ्या चिंकीने आपल्या पदार्पणाच्या पहिल्या वर्षांतच चारही आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.पात्रता फेरीतील तिची याआधीची सर्वोत्तम कामगिरी ५८४ गुण इतकी होती. नेमबाजी कारकीर्दीतील सर्वोत्तम दिवस दाखवणारे राष्ट्रीय प्रशिक्षक जसपाल राणा यांचे चिंकीने आभार मानले आहेत. २०१२मध्ये नेमबाजी खेळाला सुरुवात केल्यानंतर चिंकीने यावर्षी वरिष्ठ राष्ट्रीय संघात स्थान मिळवले आहे.