क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी आदी खेळांपाठोपाठ कुस्तीतही व्यावसायिक स्पर्धाचे वारे वाहू लागले आहेत. भारतीय कुस्ती महासंघाने (डब्लूएफआय)आयोजित केलेल्या व्यावसायिक कुस्ती स्पध्रेत खेळण्यासाठी आशियाई देशांची सहमती मिळाली आहे. लास व्हेगास येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत डब्लूएफआयचे अध्यक्ष ब्रिजभुषण शरण सिंग यांनी आशियाई देशांच्या प्रतिनिधींसमोर आगामी व्यावसायिक कुस्ती लीगचे स्वरुप सादर केले आणि प्रतिनिंधींसोबत झालेली बैठक फलदायी ठरली.
‘‘डब्लूएफआय अध्यक्षांनी येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या व्यावसायिक कुस्ती लीगचे सादरीकरण पेश केले. सर्व आशियाई पदाधिकाऱ्यांनी एकमताने डब्लूएफआयच्या या पुढाकाराचे कौतुक केले आणि ही लीग यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी पाठींब्याचे आश्वासनही दिले. तसेच या लीगमध्ये आशियाई देशांनी सहभाग घेण्याचीही खात्री दिली,’’अशी माहिती डब्लूएफआयचे सह-सचिव विनोद तोमर यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘आशियाई कुस्ती महासंघाचे अध्यक्ष डॉ. चँग केव यांनीही आनंद व्यक्त केला आणि डब्लूआयएफच्या या पुढाकाराचे कौतुक केले.’’