स्पर्धा कोणतीही असो सध्याच्या घडीला भारताला हमखास पदक मिळवून देणारा खेळ म्हणजे कुस्ती. भारताच्या मातीत रुजलेली कुस्ती मॅटवर आली, पण भारतीयांनी परिस्थितीशी जुळवत पदकांची बरसात करायला सुरुवात केली. भारताने आशियाई स्पर्धेत पहिले पदक पटकावले ते १९५४ साली. गणपत अडारकर, बी.जी. खाशिद यांनी रौप्य, तर सोहन रॉयसिंग यांनी कांस्यपदक पटकावले. आशियाई स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक अडारकर यांनीच मिळवून दिले. त्यानंतर मारुती माने, मालवा, चंदगी राम, करतार सिंग, रजिंदर सिंह, शर्मा पाल सिंग यांनी आतापर्यंत सुवर्णपदकांची कमाई केली आहे. २००६मध्ये गीतिका जखार आणि अलका तोमर या महिलांनी अनुक्रने रौप्य आणि कांस्यपदक पटकावत इतिहास रचला. पण जवळपास गेल्या २४ वर्षांमध्ये भारताला सुवर्णपदकाची कमाई करता आलेली नाही. हा सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवण्यासाठी भारताचे कुस्तीपटू सज्ज झालेले आहेत. गुवांगझाऊ येथील गेल्या आशियाई स्पर्धेत भारताला जास्त काही चमक दाखवता आली नाही. या स्पर्धेत भारताला फक्त तीन कांस्यपदकांवर समाधान मानावे लागले होते. रणवीर सिंग, सुनील कुमार राणा व मौसम खत्री यांनी कांस्यपदक पटकावले होते.

भारताचा संघ
पुरुष फ्री-स्टाइल : अमित कुमार (५७ कि.), बजरंग कुमार (६१ कि.), योगेश्वर दत्त (६५ कि.), प्रवीण राणा (७० कि.), नरसिंग यादव (७४ कि.), पवन कुमार (८६ कि.), सत्यव्रत कडियन (९७ कि.).
ग्रीको रोमन : रणविंदर सिंग (५९ कि.), संदीप तुलसी यादव (६६ कि.), के. के. यादव (७१ कि.), गुरप्रीत सिंग (७५ कि.), हरप्रीत सिंग (८० कि.), मनोज कुमार (८५ कि.), हरदीप (९८ कि.).
महिला (फ्री-स्टाइल) : विनेश फोगट (४८ कि.), बबिता कुमारी (५५ कि.), गीतिका जाखर (६३ कि.), ज्योती (७५ कि.).
सुशीलची माघार, योगेश्वरवर भिस्त
सुशील कुमार म्हणजे सध्याचा भारतीय कुस्तीचा नायक. सुशील म्हणजे पदक निश्चित, हे गेल्या चार वर्षांपासूनचे समीकरण आहे. पण दुखापती आणि आगामी महत्त्वाच्या स्पर्धा लक्षात घेता सुशीलने या स्पर्धेतून माघार घेण्याचे ठरवले आहे. पण सुशील भारतीय कुस्ती चमूमध्ये नसला तरी भारतीयांना निराश होण्याचे काहीही कारण नाही, कारण आंतरराष्ट्रीय पदक पटकावणाऱ्या कुस्तीपटूंचा भारतीय चमूमध्ये समावेश आहे. योगेश्वरला आशियाई स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करता आलेली आहे, पण असे असले तरी त्याचा सध्याचा फॉर्म पाहता त्याच्याकडून भारतीयांनी सुवर्णपदकांची अपेक्षा करणे वावगे ठरणार नाही. त्याबरोबर पुरुषांमध्ये अमित कुमार, बजरंग कुमार, नरसिंग यादव, संदीप तुलसी यादव यांच्याकडून पदकाची अपेक्षा असेल. तर महिलांमध्ये विनेश फोगट, बबिता कुमारी आणि गीतिका जाखर यांनी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी केली असून त्यांनी कामगिरीत सातत्य राखल्यास भारताला महिला विभागात तीन पदकांची निश्चिती होऊ शकते.