बॉक्सिंग लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मेरी कोमसह एल.सरिता देवी, पूजा राणी यांनी आपापल्या गटात उपांत्य फेरीत आगेकूच केली.
५१ किलो वजनी गटातून खेळणाऱ्या मेरीने दहा वर्षांहून लहान चीनच्या सी हाजिऊनवर मात केली. सुरुवातीला चाचपडत खेळणाऱ्या मेरीने त्यानंतर मात्र जबरदस्त खेळ करत विजय मिळवला.
सरिता देवीने मंगोलियाच्या स्युवद इर्डेन ऑयुनगेरलवर विजय मिळवला. पुढच्या फेरीत तिचा मुकाबला कोरियाच्या जिना पार्कशी होणार आहे. पूजा राणीने तैपेईच्या शेन डारा फ्लोराला नमवत उपांत्य फेरी गाठली. आता तिचा मुकाबला चीनच्या लि क्विआनशी होणार आहे.
साकेत मायनेनीला दुहेरी सुवर्णाची संधी
टेनिस
पुरुष आणि मिश्र दुहेरीत अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या साकेत मायनेनीला दुहेरी सुवर्णपदकाची संधी आहे. सनम सिंग आणि साकेत मायनेनी या दुहेरीतील युवा जोडीने अंतिम फेरीत धडक मारत किमान रौप्यपदक निश्चित केले. मात्र युकी भांब्री आणि दिविज शरण जोडीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. सानिया मिर्झा आणि महाराष्ट्राच्या प्रार्थना ठोंबरे जोडीने कांस्यपदकावर नाव कोरले.
लिएण्डर पेस, रोहन बोपण्णा, सोमदेव देववर्मन या खेळाडूंनी माघार घेतल्यामुळे भारताच्या टेनिसमध्ये पदकाच्या आशा धुसर झाल्या होत्या. मात्र युवा खेळाडूंनी दिमाखदार प्रदर्शन करताना किमान दोन पदकांची कमाई केली तर किमान दोन पदके निश्चित आहेत.
सनम-साकेत जोडीने थायलंडच्या सनचाइ आणि सोनचाट रतिवाताना जोडीवर ४-६, ६-३, १०-६ असा विजय मिळवला. कोरियाच्या लिम योंगक्यु आणि च्युंग ह्य़ुसेन्स जोडीने युकी-दिविज जोडीवर ६-७ (८-१०), ७-६, (८-६), ११-९ अशी मात केली. अतिशय चुरशीच्या लढतीत युकी-दिविजची जोडी ६-४ अशी आघाडीवर होती. मात्र मोक्याच्या क्षणी गुण गमावल्याने या जोडीला पराभवाला सामोरे जावे लागले.
एकेरी प्रकारात जपानच्या योशिहितो निशिओकाने युकीवर ३-६, ६-२, ६-१ असा विजय मिळवला. त्यामुळे युकीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
महिला दुहेरीत तैपेईच्या सेइह आणि चान जोडीने सानिया मिर्झा आणि प्रार्थना ठोंबरे जोडीवर ७-६, २-६, १०-४ अशी मात केली. त्यामुळे सानिया-प्रार्थनाला कांस्यपदक मिळाले. साकेत-सानिया जोडीने चीनच्या जी झेंग आणि झे झांग जोडीचा ४-६, ६-३, १०-६ असा पराभव केला.
सहा भारतीय अंतिम फेरीत
कनॉइंग
कनॉइंग आणि कायाकिंग प्रकारात भारतीय संघाने अकरापैकी सहा प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली. इन्चॉन येथे दाखल झाल्यानंतर विदेशी बोटी विकत घेणाऱ्या भारताने पुरुषांमध्ये पाच, तर महिलांमध्ये एका प्रकारात अंतिम फेरीत आगेकूच केली. १००० मीटर सी १ प्रकारात गौरव तोमारने उपांत्य फेरीची शर्यत जिंकली. १००० मीटर सी २ प्रकारात एस.अजित कुमार आणि राजीव रावत जोडीने दुसरे स्थान पटकावले. कयाकिंग प्रकारात १००० मीटर शर्यतीत रॉबर्ट राज सेल्वाराजने तिसरे स्थान मिळवले. रागिणा किरो आणि नानो देवी अहोंगशांगबाम जोडीने के टू ५०० मीटर शर्यतीत महिलांमध्ये तिसरे स्थान पटकावले. अजित सिंग, सनी कुमार, रमेश गोळी आणि ए. चिनसिंग आणि ओ. जेम्सबॉय सिंग यांनी २०० मीटर प्रकारात तिसऱ्या स्थानासह अंतिम फेरी गाठली.
खंबाटा अंतिम फेरीत
अश्वारोहण
भारताच्या याशान झुबिन खंबाटाने अश्वारोहण स्पर्धेच्या उडी मारण्याच्या प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. या स्पर्धेमध्ये घोडय़ाबरोबरच घोडेस्वाराचेही कसब पणाला लागत असते. येथील ड्रीम पार्क मैदानात झालेल्या स्पर्धेत खंबाटाने ३५ वे स्थान पटकावले.
पराभवाचेच पाढे
बास्केटबॉल
भारताच्या महिला बास्केटबॉल संघाला उपांत्यपूर्व फेरीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्यपूर्व फेरीमध्ये जपानने भारताचा ७०-३७ असा पराभव केला. भारताकडून रसप्रीत सिद्धू आणि कविता अकुला यांनी प्रत्येकी ९ गुणांची कमाई केली. कर्णधार स्मृती राधाकृष्णनला आठ गुण कमवता आले.
यजमानांकडून पराभूत
व्हॉलीबॉल
भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाला यजमान दक्षिण कोरियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. दक्षिण कोरियाने भारतावर २५-२२, २७-२५, २५-१८ अशी मात केली. उंचपुरा जी.आर. वैष्णव लौकिकाला साजेशी कामगिरी करू न शकल्याने भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. अनुभवी गुरिंदर सिंगने १३, तर नवीन राजा जेकबने १० गुण मिळवले. भारताची पुढची लढत कतारशी होणार आहे.
रिकव्‍‌र्हमध्ये पदक हुकले
तिरंदाजी
भारताच्या महिला रिकव्‍‌र्ह तिरंदाजांना पदकाने हुलकावणी दिली. कांस्यपदकासाठीच्या लढतीत जपानच्या संघाने भारतीय संघावर २७-२६ असा निसटता विजय मिळवला. दीपिका कुमारी, लैश्राम बॉम्बयला देवी आणि लक्ष्मीराणी माझी या त्रिकुटाने जपानविरुद्ध २१७ गुणांची कमाई केली. दोन्ही संघांचे गुण समान झाल्याने शूटऑफद्वारे झालेल्या मुकाबल्यात जपानने सरशी साधली. कंपाऊंड तिरंदाज दमदार प्रदर्शनासह पदकावर नाव कोरत असताना रिकव्‍‌र्ह तिरंदाजांनी मात्र निराशा केली आहे.
विजयी सलामी
कबड्डी
सुवर्णपदकाचे दावेदार असणाऱ्या भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी बांगलादेशवर मात करत विजयी सलामी दिली. महिला संघाने बांगलादेशला १९-१८ असे नमवले. भारताने मध्यंतराला २२-५ अशी भक्कम आघाडी घेत विजयाची पायाभरणी केली. पुरुष संघाने बांगलादेशवर ३०-१५ असा सहज विजय मिळवला.
उपान्त्यपूर्व फेरीत आव्हान संपुष्टात
टेबल टेनिस
भारताच्या पुरुष आणि महिला संघांचे आशियाई स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. पुरुषांना चीनकडून तर महिलांना सिंगापूरकडून पराभव पत्करावा लागला.
पुरुषांच्या उपान्त्यपूर्व फेरीमध्ये कर्णधार अचंथा शरथ कमालवर झू झिनने २१ मिनिटांमध्ये ११-७, ११-७, ११-७ असा विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात हरमीत देसाईला मा लाँगने ११-५, ७-११, ११-२, ११-६ असे पराभूत केले. तिसऱ्या सामन्यात सनिल शेट्टीला
२-११, ११-१३, १-११ असा पराभव पत्करावालागला.
महिलांमध्ये सिंगापूरने भारतावर ३-० असा विजय मिळवला. पहिल्या सामन्यात मनिका बात्राला तिआनवेई फेंगकडून ७-११, ८-११, ७-११ असा पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या सामन्यात ये लिनने अंकिता दासवर ११-९, ११-८, ११-६, ११-८ असा विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात पाऊलोमी घाटकला यिहान झोऊने ११-५, १३-११, ११-९ असे पराभूत केले.
दोन्ही विभागात निराशाच
हँडबॉल
हँडबॉलमध्ये भारताने पुरुष आणि महिला विभागात रविवारी पराभवाचेच पाढे वाचले. १३ व्या आणि १४ व्या स्थानासाठीच्या स्पर्धेत संयुक्त अरब अमिरातीने भारतावर
३२-२५ असा विजय मिळवत १३ वे
स्थान पटकावले, तर भारताला १४ व्या स्थानावरच समाधान मानावे लागले. भारतीय महिलांना उझबेकिस्तानकडून २६-४४ असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारताचा सातव्या आणि आठव्या स्थानासाठीचा सामना मंगळवारी होणार आहे.
महिलांचा यजमानांशी सामना
हॉकी
मलेशियाला ६-१ अशी धूळ चारून भारतीय महिला हॉकी संघाचे मनोबल उंचावले असून आता यजमान दक्षिण कोरियाला पराभूत करून उपान्त्य फेरीत पोहोचण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल. २००६ साली दोहामध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने दक्षिण कोरियाला पराभूत केले होते, त्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार का, याकडे भारतीयांचे लक्ष असेल.या सामन्याबाबत संघाचे मुख्य प्रशिक्षक निल हावगूड यांनी सांगितले की, दक्षिण कोरिया हा तुल्यबळ संघ आहे. पण भारताचा संघ सध्या भन्नाट फॉर्मात आहे. गोल करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. आम्ही सज्ज आहोत.