इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या हिमा दासला २०० मी. शर्यतीच्या उपांत्य फेरीत, चुकीची सुरुवात केल्यामुळे बाहेर पडावं लागलं होतं. एक दिवस आधी हिमा दासने ४०० मी. शर्यतीत रौप्य पदक कमावलं होतं, या कामगिरीमुळे हिमा २०० मी. शर्यतीतही पदक मिळवेल अशी सर्वांना आशा होती. मात्र एक छोटी चूक हिमाला महागात पडली आणि भारताने एक हक्काचं पदक गमावलं. हिमा दासने मात्र या चुकीसाठी काही जणांना जबाबदार धरलं आहे.

स्पर्धेनंतर हिमा दासने फेसबूक लाईव्ह करुन आपल्या मातृभाषेत संवाद साधला आहे. “स्पर्धेदरम्यान मी प्रचंड तणावाखाली होते. आसाममध्ये काही लोकांनी माझ्याविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे मला खूप वाईट वाटलं. मी हात जोडून विनंती करते की एखाद्या खेळाडूवर इतका दबाव टाकू नका.” मी या गोष्टी आता फारशा विचारात घेत नाहीये, मात्र अशी वक्तव्य ऐकल्यानंतर मी काही चुकीचं केलंय का असे विचार माझ्या मनात येत होते. मी हे प्रांजळपणे कबूल करते की दबावाखाली असल्यामुळे मी त्या स्पर्धेतून बाहेर गेले. यापुढे अशी वक्तव्य करणं टाळा.” हिमाने फेसबूक लाईव्हमध्ये आपली बाजू मांडली.

हिमाने आपल्या फेसबूक लाईव्हमध्ये कोणत्याही व्यक्तींचं नाव घेतलं नसलं, तरीही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आसाममधील काही स्थानिक वृत्तवाहिन्यांनी २०० मी. शर्यतीआधी हिमा दासच्या लघवीचे नमुने तपासणीसाठी घेतल्याची बातमी दाखवली. हा प्रकार हिमाला डोपिंग केसमध्ये अडकवण्यासाठी सुरु असल्याचं प्रसारमाध्यमांनी म्हटलं होतं. हा प्रकार हिमाला समजल्यामुळे ती खूप दु:खी झाल्याचं प्रशिक्षक निपुन दास यांनी म्हटलंय. या घटनेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात आपला रोष व्यक्त केला. एखाद्या खेळाडूला चांगली कामगिरी करण्यासाठी किती दबाव टाकला जाणार आहे असा प्रश्न चाहते विचारत आहेत.