आशियाई खेळांमध्ये मंगळवारी तिसऱ्या दिवशी नेमबाजीमध्ये सौरभ चौधरीने भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचं काम केलं आहे. १० मी. एअर पिस्तुल प्रकारात १६ वर्षीय सौरभ चौधरीने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. मध्यमवर्गीय एका गरीब शेकऱ्याच्या घरात जन्माला आलेल्या सौरभ वयाच्या १६ व्या वर्षी आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सुवर्ण पदकाच्या कामगिरीनंतर सौरभ भावूक झाला होता.

“मला शेती करायला आवडते. नेमबाजीचा सराव करत असताना मला जास्त वेळ गावी जाऊन शेती करायला मिळाली नाही. पण जेव्हा जेव्हा गावी गेलो तेव्हा नक्कीच मी शेतात जायचो. वडिलांना मदत म्हणून शेतीचे करायचो. यापूढेही जेव्हा जेव्हा मला शेती वेळ मिळेल मी शेती करेल. वडिलांना शेतीमध्ये मदत करायला मला आवडते.” अशी प्रतिक्रिया १६ वर्षीय सौरभने सुवर्णपदक जिंकल्यानंतर दिली.

सौरभने आशियाई स्पर्धेतील नेमबाजीधील अंतिम फेरीत जपानच्या टी. मस्तुदाला मागे टाकत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. याच प्रकारात भारताच्या अभिषेक वर्माला कांस्यपदक मिळालं आहे. पात्रता फेरीतही सौरभ चौधरीने अव्वल स्थान पटकावलं होतं. सौरभच्या या कामगिरीसाठी उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने ५० लाखांचं इनाम घोषित केलं आहे. दुसरीकडे ५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात भारताच्या संजीव राजपूतने रौप्य पदकाची कमाई केली.