भारतीय खेळाडूंना अपेक्षेप्रमाणे जिम्नॅस्टिक्समधील सांघिक प्रकारांमध्ये निराशाजनक कामगिरीस सामोरे जावे लागले. पुरुषांच्या कलात्मक प्रकारात भारताचे आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले तर महिलांमध्ये दीपा कर्माकरच्या अनुपस्थितीत भारतास आठ संघांमध्ये सातवे स्थान मिळाले.

आशिष कुमार, राकेश पात्रा, गौरव कुमार, योगेश्वर सिंग व सिद्धार्थ वर्मा यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाला २२९.९५० गुण नोंदवता आले. त्यांना नववे स्थान मिळाले. प्राथमिक फेरीतील पहिल्या आठ संघांना अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला. आठव्या क्रमांकाने अंतिम फेरी गाठणाऱ्या इराण संघाने २३०.३०० गुणांची नोंद केली. चीन, जपान व दक्षिण कोरिया यांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक मिळाले.

महिलांमध्ये दीपाच्या अनुपस्थितीचा भारतास फटका बसला. प्रणती नायक, अरुणा रेड्डी, प्रणती दास व मंदिरा चौधरी यांचा समावेश असलेल्या भारताने सातवा क्रमांक मिळवताना १३८.०५० गुणांची कमाई केली. चीन संघाने सुवर्णपदक जिंकले तर दक्षिण कोरिया व जपान यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळाले.

सांघिक स्पर्धेतून दीपाची माघार; वैयक्तिक स्पर्धेत सहभाग निश्चित

भारताचे आशास्थान असलेली दीपा कर्माकरला कलात्मक जिम्नॅस्टिक्समधील सांघिक स्पर्धेतून दुखापतीची शक्यता लक्षात घेऊन माघार घ्यावी लागली. ‘‘जर तिने सांघिक स्पर्धेत भाग घेतला असता, तर कदाचित तिच्या कारकीर्दीला धोका निर्माण करणारी दुखापत तिला झाली असती.

त्यामुळेच हा धोका टाळण्यासाठी तिला सांघिक स्पर्धेतून विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र ती बॅलन्सिंग प्रकारात भाग घेणार आहे,’’ असे तिचे प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी यांनी सांगितले. दीपाला दुखापतीमुळे यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही सहभागी होता आले नव्हते.

भारतीय महिला पात्रता फेरीत द्वितीय स्थानी

भारतीय महिलांच्या कम्पाऊंड तिरंदाजी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पात्रता फेरीत कोरियापाठोपाठ द्वितीय स्थान पटकावत अंतिम फेरी गाठली आहे. या पात्रता फेरीत भारताकडून ज्योती सुरेखा वेन्नामने ७०६ गुण पटकावत द्वितीय स्थान मिळवले आणि मुस्कान किरणने ६९१ गुणांसह नववे स्थान पटकावले, तर मधुमिता कुमारीने ६८९ गुणांसह ११वे स्थान पटकावले, तसेच त्रिशा देवने ६८३ गुण मिळवले. भारतीय महिला संघाने सर्व मिळून एकूण २०८५ गुणांची कमाईसह द्वितीय क्रमांक पटकावला.

नौकानयनपटू पाच स्पर्धाच्या अंतिम फेरीत

जकार्ता : भारतीय नौकानयनपटूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांच्या कामगिरीतील सातत्य कायम राखले असून पाच प्रकारांमध्ये त्यांना अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळणार आहे.  रोहित कुमार आणि भगवान सिंग या जोडीने ७ मिनिटे १४ सेकंद २३ शतांश सेकंद अशी वेळ देत पात्रता फेरी पार केल्याने त्यांना अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळणार आहे. ही अंतिम फेरी २४ ऑगस्टला होणार आहे. संजिता डुंग डुंग, अन्नू, नवनीत कौर आणि यामिनी सिंग या चौघा महिलांच्या नौकानयन संघाने ७ मिनिटे ५३ सेकंद २९ शतांश सेकंदांची वेळ देत अंतिम फेरीस पात्र ठरल्या असून ती शर्यतदेखील २४ तारखेला होणार आहे. कमी वजनाच्या गटातदेखील भारतीय जोडी आधीच पात्र झाली आहे. तर त्याआधी दत्तू भोकनळ हा सिंगल स्कल प्रकारात तर संजिता ही डबल स्कल प्रकारासाठी पात्र ठरली आहे.  पाच  स्पर्धामध्ये अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळाल्याने भारताला नौकानयनात पदक मिळण्याची आशा आहे.

उपउपांत्यपूर्व फेरीत नवजीत पराभूत

जकार्ता : तायक्वांदोमधील ८० किलो गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत नवजीत मानचे आव्हान संपुष्टात आले. चीनच्या लिंगलाँज चेनने नवजीतचा २०-६ असा पराभव केला. पहिल्या फेरीत चेन ०-६ असा पिछाडीवर होता. मात्र दुसऱ्या फेरीत त्याने आपले खाते उघडले. पण लिंगजॉनने जोरदार मुसंडी मारत आठ गुण घेतले आणि १५-५ अशी आघाडी घेतली. तिसऱ्या फेरीत लिंगजॉनचेच वर्चस्व दिसून आले.

जलतरणपटू अंतिम फेरीस अपात्र

जकार्ता : भारताचे जलतरणपटू संदीप शेजवळ, साजन प्रकाश आणि अविनाश मणी हे त्यांच्या गटात अव्वल ठरूनदेखील अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकले नाहीत. १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये शेजवळने ६२.०७ सेकंद, १०० मीटर बटरफ्लायमध्ये साजन प्रकाशने ५४.०४ सेकंद, तर अविनाश मणीने ५६.०८ सेकंद अशी वेळ देऊनदेखील ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरले नाहीत. ४ बाय १०० मीटर फ्रीस्टाईल रिले प्रकारात साजन प्रकाश, वीरधवल खाडे, अंशुल कोठारी आणि अ‍ॅरॉन डिसुझा यांनी ३ मिनिटे २५ सेकंद १७ शतांश सेकंद अशी वेळ दिली आहे.

शेवटच्या दिवशी मल्लांकडून निराशा

जकार्ता : मोठय़ा यशाची अपेक्षा करणाऱ्या भारतीय मल्लांना येथे कुस्ती स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी अपयशच पाहावयास मिळाले. ग्रीको-रोमन विभागात हरप्रीत सिंगला कांस्यपदकाच्या लढतीत पराभूत व्हावे लागले. ८७ किलो गटात त्याला कझाकिस्तानच्या अझामत कुस्तुबायेव्हने ६-३ असे हरवले. भारताच्या गुरप्रीत सिंग (७७ किलो), नवीन कुमार (१३० किलो) व हरदीप (९७ किलो) यांनीही निराशा केली. हरप्रीतविरुद्ध अझामतच्या बाजूने पंचांनी पक्षपाती निर्णय दिले. आमच्या मल्लास जाणीवपूर्वक पराभूत करण्यात आले, असा आरोप त्याचे प्रशिक्षक कुलदीप सिंग यांनी केला. भारताच्या बजरंग पुनिया व विनेश फोगट यांनी मिळवलेली सुवर्णपदके व दिव्या काकरनचे कांस्य अशा केवळ तीनच पदकांवर भारताला या स्पर्धेत समाधान मानावे लागले.