इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या अरपिंदर सिंहने तिहेरी उडीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. या विजयानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी ट्विट करुन अरपिंदरचं कौतुकही केलं. मात्र सुवर्णपदकाची कमाई केल्यानंतरही पंजाबच्या अरपिंदरच्या वाटेला येणारी परवड काही केल्या थांबत नाहीये. अरपिंदरच्या परिवाराने इंडियन एक्स्प्रेसशी याबद्दल संवाद साधला.

२०१५ साली अरपिंदरने पंजाबला सोडून हरियाणाकडून खेळणं पसंत केलं. हरियाणा सरकारने खेळाडू म्हणून अरपिंदरला पंजाबच्या तुलनेत चांगल्या सुविधा दिल्या. मात्र काही वर्षांनंतर हरियाणातही अरपिंदरला निराशेला सामोरं जावं लागलं. स्वातंत्र्यदिनानिमीत्त खेळाडूंना देण्यात येणाऱ्या बक्षिसांसाठी अरपिंदरने आपला अर्ज भरला होता. मात्र अरपिंदर मुळचा पंजाबचा असल्याचं कारण देऊन हरियाणा सरकारने अरपिंदरला बक्षिस नाकारलं. इंडोनेशियातील विजयानंतर आता कोणत्या राज्याकडून बक्षिसाची अपेक्षा पंजाबकडून करायची की हरियाणाकडून अशा द्विधा मनस्थितीत अरपिंदरचा परिवार पडला आहे.

पंजाबकडून खेळत असताना अरपिंदरने तब्बल १४ राष्ट्रीय पदकं मिळवली आहेत. २०१४ साली झालेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये अरपिंदरने कांस्यपदकाची कमाई केली होती. यानंतर अरपिंदरला पंजाब पोलिसांकडून नोकरीची ऑफर येईल अशी आशा होती. मात्र पंजाब सरकारने अरपिंदरला फक्त सहा लाख रुपयांची मदत केली. या तुलनेत हरियाणा सरकारने अरपिंदरला चांगल्या मानधनाची ऑफर दिली. हरियाणाकडून खेळण्याचा निर्णय घेतल्यानंतर अरपिंदरच्या वडिलांनी घर गहाण टाकून त्याच्या ट्रेनिंगसाठीचा खर्च उभा केला. सध्या अरपिंदर ONGC मध्ये काम करतो, मात्र क्रीडा मंत्रालयाकडून मिळणारी मदत आणि पगार यातला बराचसा भाग हा ट्रेनिंगवर खर्च होतो. याचसोबत अरपिंदर पंजाबमधील आपल्या गावात घर बांधत असल्यामुळे पुन्हा त्याच्यासमोर पैक्षाचा प्रश्न निर्माण झालाय. अरपिंदरचे वडील जगबीर सिंह यांनी माहिती दिली.

आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये चीन, जपान, कोरिया यासारख्या अन्य तुल्यबळ देशांच्या खेळाडूंशी दोन हात करत अरपिंदरने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. हरियाणा सरकारने पदक विजेत्या खेळाडूंना भरघोस इनामाची घोषणा केली आहे. मात्र अरपिंदरला सध्यातरी ही मदत मिळू शकणार नाहीये. त्यामुळे अरपिंदरसारख्या खेळाडूची राज्य सरकारने काळजी घेतली पाहिजे असं मत प्रशिक्षक एस. एस. पन्नू यांनी व्यक्त केलं आहे.