मंगळवारी भारताच्या मनजीत सिंहने आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये ८०० मी. शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. या कामगिरीनंतर मनजीतवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत होता. तेजिंदरपाल तूर, नीरज चोप्रा यांच्यानंतर सुवर्णपदकाची कमाई करणारा मनजीत तिसरा भारतीय अॅथलिट ठरला. या कामगिरीनंतर मनजीत सिंहच्या घरी त्याचे कुटुंबिय आतुरतेने त्याची वाट पाहत आहेत. मनजीत हरियाणाच्या जिंद तालुक्यातील नरवाना गावाचा रहिवासी आहे. मनजीतची पत्नी किरणदेवीने ५ महिन्यांपूर्वी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. मात्र आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी उटी आणि भुतान सराव करत असलेल्या मनजीतने अजुनही आपल्या मुलाचा चेहराही बघितला नाहीये.

“अभीरचा जन्म झाल्यापासून मनजीत सरावासाठी घराबाहेर आहे. मनजीत नोकरी करत नसला तरीही या काळामध्ये आपल्या मुलासाठी आठवणीने तो भेटवस्तू पाठवत होता. मात्र त्याचं सुवर्णपदक आता आमच्यासाठी खरी भेटवस्तु असणार आहे. तो जेव्हा कधी घरी येईल तेव्हा आपल्या मुलाच्या गळ्यात ते पदक टाकेल.” मनजीतची पत्नी किरणदेवीने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत आपल्या नवऱ्याच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला.

मनजीतचे वडील रणधीर हे आपल्या काळात थाळीफेक खेळ खेळायचे. लहानपणापासून मनजीत धावण्याचा सराव करायचा. पाच वर्षाचा असल्यापासून मनजीतने धावण्याचा सराव केल्या. कित्येकदा घरातील म्हशींना चरण्यासाठी मनजीत घेऊन जायचा, मात्र दुध काढण्याच्या वेळेस तो आवर्जून घरी यायचा. आपला फिटनेस कायम राखण्यासाठी ताजं दुध पिण्याकडे मनजीतचा नेहमी कल असायचा. ८०० मी. शर्यतीत मनजीतसह जेनसन जॉ़न्सन या भारतीय खेळाडूने रौप्य पदकाची कमाई केली.