Asian Games 2018 : सध्या एकीकडे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सुरु आहे, तर दुसरीकडे आशियाई खेळांच्या स्पर्धांची रेलचेल आहे. आशियाई स्पर्धांमध्ये विविध खेळ खेळले जात आहेत. या स्पर्धेत भारताला आतापर्यंत समाधानकारक यश मिळाले आहे. पण फुटबॉल या खेळासाठी भारताच्या संघाचा या स्पर्धांमध्ये समावेश करण्यात आला नाही. पण या स्पर्धांच्या एका फुटबॉल सामन्यात एका खेळाडूने भन्नाट खेळ केला.

चीन आणि ताजिकीस्तान या दोन संघामध्ये फुटबॉल सामना सुरु होता. या सामन्यात मध्यांतर होईपर्यंत चीन ३-० ने आघाडीवर होते. तसेच मध्यांतरानंतर सामन्याच्या ५६व्या मिनिटापर्यंत चीन ६-० ने आघाडीवर होते. पण त्या नंतर एका पर्यायी खेळाडूला मैदानात प्रवेश मिळाला आणि तिने तडाखेबाज खेळ केला.

चीनच्या वांग शानशान हिने पर्यायी खेळाडू म्हणून ५६व्या मिनिटाला मैदानात प्रवेश केला. आणि त्यानंतर पूर्ण खेळाचा ताबा जणू तिने घेतल्याप्रमाणे त्याने खेळ केला. वांगने २९ मिनिटाच्या खेळात एकूण ९ गोल केले. चीनकडून एकूण ६५ वेळा गोलपोस्टवर आक्रमणे झाली. त्यापैकी ३३वेळा चेंडू गोलपोस्टच्या रेषेत गेला. पण त्यापैकी अखेर १६ वेळा गोल करण्यात चीनला यश आले.

या सामन्यात वांगने एकूण ९ गोल केले. त्यापैकी शेवटचे ३ गोल हे तिने अतिरिक्त ३ मिनिटाच्या भरपाई काळात केले. बी गटात हा सामना झाला. या सामन्यात चीनने ताजिकिस्तानचा १६-० असा धुव्वा उडवला. या स्पर्धेत आतापर्यंत वांगच्या नावावर ११ गोल नोंदवण्यात आले आहेत. आता बुधवारी या गटात चीन आणि कोरिया यांच्यातील सामन्यात गटाचा विजेता ठरणार आहे.