आशियाई खेळांच्या दुसऱ्या दिवशीही भारतीय नेमबाजपटूंनी पदकाची कमाई करत भारताला आश्वासक सुरुवात करुन दिली. १० मी. एअर रायफल प्रकारात भारताच्या दिपक कुमारने रौप्यपदकाची कमाई केली. मोक्याच्या क्षणी संयमाने खेळ करत दिपकने दमदार पुनरागमन करत मातब्बर खेळाडूंची झुंज मोडीत काढली. दिपकने २४७.७ गुणांची कमाई केली. या कामगिरीनंतर सर्वच स्तरातून दिपकवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.

पात्रता भेरीत भारताच्या रवी कुमार आणि दिपक कुमार यांनी आश्वासक खेळ करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. रवी आणि दिपकच्या अंतिम फेरीतील समावेशामुळे या प्रकारात भारत दोन पदकांची कमाई करेल असं चित्र निर्माण झालं होतं. पहिल्या दिवशी कांस्यपदकाची कमाई केलेल्या रवी कुमारनेही आपला सर्व अनुभव पणाला लावत अखेरच्या क्षणांपर्यंत आपलं आव्हान कायम राखलं होतं. मात्र मोक्याच्या क्षणी अपेक्षित कामगिरी न करता आल्यामुळे रवी कुमारला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.