जकार्ता : हरयाणाच्या मुलींनी कुस्तीमध्ये भारताला पदके मिळवून देण्याची परंपरा सुरू केल्यानंतर राजधानी दिल्लीच्या दिव्या कांकरननेदेखील ६८ किलो वजनी गटात देशाला कांस्यपदक मिळवून दिले. चायनीज तैपेई कांस्यपदकाची ही लढत दिव्याने अवघ्या दीड मिनिटात जिंकून घेत भारताच्या पदकतालिकेत भर घातली.

चायनीज तैपेईच्या चेन वेनलिंगविरुद्ध दिव्याची कांस्यपदकासाठीची लढत होती. दिव्याच्या मानाने चेन थोडीशी उंच आणि सडसडीत असल्याने ती चपळपणाचा फायदा उठवण्याची चिन्हे दिसत होती. त्या तुलनेत दिव्याची उंची कमी आणि बांधादेखील जास्त भरीव असल्याने दिव्या भारताला पदक मिळवून देण्यात यशस्वी ठरते का, याकडे भारतीय क्रीडाप्रेमींचे लक्ष लागलेले होते.

दिव्याने सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या वीस सेकंदातच चेनच्या पायाची पकड करत प्रारंभीच चार गुण वसूल केले. त्यामुळे चेन काहीशा बचावात्मक पवित्र्यात जात असल्याचे दिसताच दिव्याने पुन्हा पहिल्या मिनिटाच्या अखेरीस तिची मागून पकड करत अजून दोन गुण वसूल केले. त्यानंतर चेनला दोन वेळा पालथे पाडून दिव्याने चार गुण वसूल करीत तांत्रिक श्रेष्ठत्वाच्या नियमानुसार १०-० अशी मात केली. अवघ्या दीड मिनिटाच्या आत लढत निकाली निघाली. सोमवारी विनेश फोगटने भारताला आशियाई महिला कुस्तीमधील सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर भारताला मंगळवारी दुसऱ्या कन्येने कुस्तीत पदक मिळवून देत भारताच्या पदक तालिकेत मोलाची भर घातली.