दक्षिण कोरियावर ५-३ अशी विजय

भारतीय पुरुष संघाने अपराजित्व राखताना तुल्यबळ दक्षिण कोरियावर ५-३ अशी मात केली आणि हॉकीच्या उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.त्यांचा हा सलग चौथा विजय आहे. भारतीय महिला संघाने शनिवारी उपांत्य फेरी गाठली होती.

विजेतेपदासाठी दावेदार असलेल्या भारताने साखळी गटात सलग चौथा विजय नोंदवला. कोरियाविरुद्ध पूर्वार्धात त्यांनी ३-० अशी आघाडी घेतली होती. भारताकडून रुपिंदरपाल सिंग (पहिले मिनिट), चिंगलेनासाना सिंग (तिसरे मिनिट), ललितकुमार उपाध्याय (१५वे मिनिट), मनप्रीत सिंग (४८वे मिनिट) व आकाशदीप सिंग (५५वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. कोरियाकडून मनजी जुंगने ३३व्या व ३५व्या मिनिटाला गोल केला, तर जोंगहुआन जुंगने ५९व्या मिनिटाला गोल मारला.

साखळी गटात भारतापुढे कोरियाचेच मुख्य आव्हान होते, परंतु सामन्याच्या प्रारंभापासूनच भारतीय खेळाडूंनी धारदार आक्रमण केले. पहिल्याच मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरद्वारा रुपिंदरने संघाचे खाते उघडले. या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच कोरियाने आणखी एक गोल स्वीकारला. रुपिंदरने दिलेल्या पासवर चिंगलेनासानाने रिव्हर्स फ्लिक करीत हा गोल केला. १५व्या मिनिटाला ललित कुमारने हुकमी संधीचा लाभ घेत संघास ३-० अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात हीच आघाडी कायम होती.

कोरियन खेळाडूंना उत्तरार्धात सूर गवसला. तीनच मिनिटांनी त्यांना मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरद्वारा मनजीने गोल केला. पुन्हा दोन मिनिटांनी त्याने जोरदार मुसंडी मारून गोल केला व सामन्यात रंगत निर्माण केली. त्यानंतर कोरियाच्या काही चाली भारतीय बचावरक्षकांनी शिताफीने परतवल्या. ४८व्या मिनिटाला आकाशदीपने कोरियाच्या बचावरक्षकांना चकवित मनप्रीतकडे चेंडू दिला. मनप्रीतने कोणतीही चूक न करता गोल केला. पुन्हा सात मिनिटांनी आकाशदीपने मनदीप सिंगच्या पासवर गोल करीत भारताची आघाडी ५-२ अशी केली. हीच आघाडी कायम ठेवत भारत जिंकणार असे वाटत असतानाच कोरियाच्या जोंगजुआनने गोल केला. त्यानंतर मात्र भारतीय खेळाडूंनी आघाडी कायम ठेवत सामना जिंकला.

भारताने साखळी गटात १२ गुणांसह आघाडी स्थान राखले आहे. अखेरच्या सामन्यात त्यांची श्रीलंकेशी गाठ पडणार असून हा सामना मंगळवारी होईल.