Asian Games 2018 : गेल्या १४ दिवसांपासून सुरु असलेला एशियाड स्पर्धांच्या खेळांचा थरार आज संपला. आज भारताने १४व्या दिवशी २ सुवर्ण पदके कमावत भारतीय चाहत्यांना शेवटच्या दिवशी गोड आठवणी दिल्या. बॉक्सर अमित पांघलने ४९ किलो वजनी गटात, तर प्रणब बर्धन-शिबनाथ सरकार या जोडीने ब्रिज क्रीडा प्रकारच्या पुरुष दुहेरी गटात सुवर्णपदक जिंकले. याशिवाय भारताने दिवसभरात स्क्वॉशमध्ये एका रौप्यपदकाची कमाई केली. तर भारतीय पुरुष हॉकी संघाने भारताला कांस्यपदक जिंकवून दिले आणि भारताची पदकसंख्या ६९वर नेली. महत्वाचे म्हणजे एशियाड स्पर्धांच्या इतिहासात भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

भारताने यंदाच्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक ६९ पदके मिळवली. या आधी गुआंगझू येथे झालेल्या २०१० सालच्या आशियाई स्पर्धांमध्ये भारताला ६५ पदके मिळवण्यात यश आले होते. तर १९८२ साली नवी दिल्लीत झालेल्या स्पर्धांमध्ये भारताने ५७ पदकांची कमाई केली होती. तीच कामगिरी करण्यात भारताला २०१४च्या इंचियॉन आशियाई स्पर्धांमध्ये यश आले होते. याशिवाय, २००६ साली झालेल्या दोहा स्पर्धेत (५३), १९६२ सालच्या जकार्ता स्पर्धांमध्ये (५२) आणि १९५१ सालच्या नवी दिल्लीतील स्पर्धांमध्ये (५१) भारताला पदकांची अर्धशतक गाठता आले होते.

सर्वाधिक सुवर्ण पदकांचीही बरोबरी

यंदाच्या स्पर्धांमध्ये भारताने १५ सुवर्णपदके पटकावत आपल्या सर्वाधिक सुवर्ण पदकांच्या कामगिरीची बरोबरी केली.