भारतीय ऑलिम्पिक संघटनेने, आगामी आशियाई खेळांसाठी भारतीय फुटबॉल संघाला अद्याप परवानगी दिलेली नाहीये. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने स्विकारलेल्या या पवित्र्यामुळे भारतीय फुटबॉल महासंघात संभ्रमाचं वातावरण पसरलेलं आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक स्टिफन कॉन्सटनटाईन यांनी ऑलिम्पिक संघटना आणि सरकारने भारतीय संघाला आशियाई खेळांमध्ये सहभाग घेण्याची परवानगी दिली होती, अशी माहिती प्रसारमाध्यांना दिली होती. मात्र ऑलिम्पिक संघटनेकडून फुटबॉल महासंघाला लिखीत स्वरुपातली परवानगी मिळाली नव्हती, त्यामुळे फुटबॉल महासंघ तोंडावर आपटल्यासारखी परिस्थिती झाली आहे.

भारतीय फुटबॉल महासंघाचे महासचिव कुशल दास यांनी प्रसारमाध्यमांना याविषयीची माहिती दिली, “भारतीय पुरुष आणि महिला फुटबॉल संघाला आशियाई खेळांसाठी परवानगी नाकारण्यात आल्याचं वृत्त खरं आहे. दुरदृष्टीचा अभाव आणि स्पर्धात्मक फुटबॉल खेळण्याचा अभाव असल्याचं कारण देत ऑलिम्पीक संघटनेने परवानगी नाकारली आहे.” ऑलिम्पिक संघटनेने घेतलेल्या पवित्र्यावर फुटबॉ़ल महासंघाने आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “फुटबॉल हा जागतिक खेळ आहे, जगभरातील २१२ देश फुटबॉल खेळतात. आशियाई खंडातले सर्वोत्तम ५ संघ हे फिफा विश्वचषकात सहभागी होतात. त्यामुळे फिफा आणि आशियाई खेळांची तुलना करुन ऑलिम्पीक समितीने त्यांच्याकडे नसलेल्या दूरदृष्टीचं उहाहरण दिलं आहे”. आपल्या प्रसिद्धीपत्रकात फुटबॉल महासंघाने आपली बाजू स्पष्ट केली आहे.

आशियाई खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी असलेल्या निकषांमध्ये, सांघिक खेळांमध्ये भारताचा संघ आशियाई देशांमध्ये सर्वोत्तम ८ स्थानांवर येणं गरजेचं आहे. सध्या भारताचा संघ आशियाई देशांमध्ये १४ व्या तर महिलांचा संघ १३ व्या स्थानावर आहे. मात्र गरजेनुसार या निकषांमध्ये शिथीलता आणली गेली होती. काही दिवसांपूर्वी भारताने इंटरकॉन्टिनेंटल चषक पटकावल्यानंतर भारताला आशियाई खेळांमध्ये सहभाग मिळावा अशी चर्चा सुरु होती. मात्र परवानगी नाकारताना ऑलिम्पिक संघटनेने फुटबॉल महासंघाशी एकदाही चर्चा करण्याची तसदी दाखवली नसल्याने महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फुटबॉल महासंघ या प्रकरणी क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांना मध्यस्थी करण्यासाठी विनंती करणार असल्याचं समजतंय.