भारतीय महिलांपाठोपाठ पुरुष कबड्डी संघानेही एशियाड २०१८ स्पर्धेत धडाकेबाज सुरुवात केली आहे. आपल्या पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा ५०-२१ असा पराभव केला आहे. भारत या स्पर्धेत सुवर्णपदकासाठी दावेदार संघ मानला जात आहे.

अवश्य वाचा – Asian Games 2018 Kabaddi : भारतीय महिलांची धडाकेबाज सुरुवात, पहिल्याच सामन्यात जपानचा धुव्वा

पहिल्या सत्रात भारतीय खेळाडूंनी आक्रमक सुरुवात करत १० व्या मिनीटाला तब्बल ८ गुणांची आघाडी घेतली. मात्र नंतरच्या काही मिनीटांमध्ये बांगलादेशने पुनरागमन करत भारताली सर्वबाद करत आपली पिछाडी कमी केली. मात्र दिपक निवास हुडाच्या चढायांनी भारताचं पारडं पहिल्या सत्रात कायम वरतीच राहिलं. अखेर मध्यांतरापर्यंत भारताने २०-१२ अशी ८ गुणांची आघाडी पुन्हा एकदा कायम राखली.

दुसऱ्या सत्रात मात्र भारतीय चढाईपटूंनी बांगलादेशला सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही. मोनू गोयत, कर्णधार अजय ठाकूर, प्रदीप नरवाल यांनी आक्रमक खेळ करत भारताची आघाडी वाढवली. याचसोबत डावा कोपरारक्षक गिरीश एर्नाकनेही चांगला बचाव करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. संदीप नरवालनेही बचावात गिरीश एर्नाकला चांगली साथ दिली. दुसऱ्या सत्रात रिशांक देवाडीगानेही मैदानात उतरत चांगल्या गुणांची कमाई केली.